होमपेज › Sangli › हमीभाव वाढले; कडधान्ये महागली

हमीभाव वाढले; कडधान्ये महागली

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 12:02AMसांगली : प्रतिनिधी

केंद्र शासनाने चौदा पिकांच्या  हमीभावात मोठी वाढ केली आहे.  त्याचे पडसाद गुरुवारी बाजारपेठेत जाणवले. हरभरा डाळ, तूरडाळ, मुगाच्या दरात क्विंटलला 400 ते 500 रुपये वाढ झाली आहे. चालू खरीप हंगामात पिकणार्‍या शेतीमालासाठी हमीभावात मोठी वाढ करण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडीविषयक समितीच्या बैठकीत झाला. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, कापूस, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ, कारळे, धान या 14 पिकांच्या हमीभावात मोठी वाढ झाली आहे. क्विंटलला 180 ते 1800 रुपये वाढ झाली आहे. 

शेतीमालाच्या हमीभावात मोठी वाढ झाल्याने त्याचे परिणाम बाजारपेठेत दिसून आले. हरभरा डाळ क्विंटलला 4 हजार ते 4 हजार 100 वरून 4 हजार 400 ते 4 हजार 500 रुपये झाली. तूरडाळ 5 हजार ते 5 हजार 500 रुपयांवरून 5 हजार 500 ते 6 हजार रुपये झाली आहे. मुगाचा दरही 4 हजार ते 5 हजार रुपयांवरून 5 हजार, 5 हजार 500 ते 6 हजार रुपये झाला आहे, अशी माहिती सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक व अन्‍नधान्य, कडधान्याचे व्यापारी अण्णासाहेब चौधरी यांनी दिली.  दरम्यान, सांगली मार्केट यार्डात ज्वारी, बाजरीची आवक अतिशय कमी आहे. गिर्‍हाईकही कमी आहे. त्यामुळे ज्वारी, बाजरीच्या हमीभावात झालेल्या वाढीचा परिणाम बाजारपेठेतील ज्वारी, बाजरीच्या दरावर झाला नसल्याचे चौधरी यांनी सांगितले.