Fri, Nov 16, 2018 13:05होमपेज › Sangli › द्राक्ष उत्पादनासह दरातही वाढ

द्राक्ष उत्पादनासह दरातही वाढ

Published On: Apr 17 2018 1:51AM | Last Updated: Apr 16 2018 8:32PMकुंडल : वार्ताहर 

पलूस तालुक्यात द्राक्ष उत्पादकांना चालू हंगाम फायद्याचा ठरला आहे. तालुक्यातील द्राक्ष उत्पादनात  वाढ झाली आहे. तसेच  द्राक्षांना मागणी वाढल्याने प्रति किलोस सुमारे 45 ते 65 रुपये दर मिळत आहे.

गतवर्षी ऑक्टोंबरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता, त्यामुळे ऑक्टोबर छाटण्या लांबल्या होत्या. ऑक्टोबर छाटणी झाल्यावर फळधारणेनंतर परिसरात दमट वातावरण, दावण्या सारख्या रोगांच्या प्रादुर्भावातून देखील द्राक्ष बागा बचावल्या. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली.

साधारणत: मिरज, तासगाव - कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्षबागा संपल्यानंतर पलूस - कडेगाव तालुक्यातील द्राक्षबागांचा हंगाम सुरू होतो. मात्र चालू वर्षी जानेवारीत समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने परिसरात ढगाळ वातावरण तयार झाले होते. यामुळे  द्राक्षउत्पादक चिंतेत होता. मात्र त्यानंतर द्राक्षबागांना पोषक वातावरण तयार झाले.  द्राक्षांचा दर्जा चांगला व वजनातही वाढ झाली. 

साधारणत: मार्चअखेरीस  किंवा एप्रिलच्या प्रारंभी कोकण व कर्नाटकातील हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत आवक होते. त्यामुळे द्राक्षांच्या मागणीत घट होते. मात्र आंब्याची आवक बाजारपेठेत झाली नसल्याने द्राक्षांचे दर टिकून आहेत.  द्राक्षे आता प्रति किलो 45 ते 65 रुपये व काळी द्राक्षे 80 ते 90 रुपये दराने व्यापारी खरेदी करू लागले आहेत. या हंगामात सरासरी उतार्‍यात देखील वाढ झाली आहे. एकरी 10 ते 14 टन द्राक्ष उत्पादन मिळत असून एकरी  6 ते 9 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने  बागायतदारामध्ये फिलगुड वातावरण आहे.

Tags : sangli, grape products, Growth rates, sangli news,