Sat, Jan 19, 2019 10:01होमपेज › Sangli › ग्रामीण भागात बेरोजगारीत वाढ

ग्रामीण भागात बेरोजगारीत वाढ

Published On: Apr 08 2018 2:16AM | Last Updated: Apr 07 2018 8:02PMकवठेपिरान : संजय खंबाळे 

ग्रामीण भागात बहुसंख्य तरूण उच्चशिक्षण घेऊन देखील नोकरीच्या शोधात फिरत आहेत. ग्रामीण भागात सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढूलागले आहे.पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी होते, मात्र आता हे चित्र बदलले आहे.  शिक्षणाचा प्रसार झाल्याने पदवीधरांच्या संख्येत  वाढ झाली आहे, मात्र पदवी घेऊन देखील तरुणांना नोकरीसाठी अनेकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या तरुणांच्या संख्येत भरच पडत आहे. मात्र पदवी आता नोकरी मिळवून देण्यासाठी उपयोगी ठरत नसल्याचे चित्र आहे. नोकरी मिळत नसल्याने असंख्य बेकार तरुणांची घरे अक्षरश: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. 

 अत्याधुनिक यंत्रांचा फटका 

आज बहुसंख्य ठिकाणी अत्याधुनिक यंत्रांचा वापर वाढला आहे. कमी कालावधीत जास्त उत्पन्न व कमी खर्चात मिळवण्याचा कल वाढत आहे. मात्र नेमका याचाच या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फटका बसतो आहे.

गुन्ह्यांमध्ये तरुणांची वाढती संख्या

अनेक सुशिक्षित तरुण नोकरी नसल्याने गुन्हेगारी, व्यसनाकडे वळत आहे.  अनेक गुन्ह्यांमध्ये  18 ते 30 या वयोगटातील तरुणांची संख्या जास्त दिसते. याकडे आता जाणकार लोक लक्ष वेधत आहेत. तर आता उदरनिर्वाहासाठी करायचे काय, अशा प्रश्‍नाच्या वावटळीत या तरुणांचे भवितव्य हेलकावे खाऊ लागले आहे.  

‘मुद्रा’साठी बँकांकडून टाळाटाळ 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरूण उद्योग व्यवसायाकडे वळावेत यासाठी मुद्रा योजनेची घोषणा केली.  या योजने अंतर्गत 50 हजारांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे. मात्र  अपवाद वगळता अनेक बँकांकडून या योजनेतून कर्ज देण्यासाठी तरुणांना टाळाटाळ केली जात आहे. याचाही फटका तरुणांना बसत आहे. यात संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Tags : Sangli, Growth,  rural, areas, unemployment