Thu, Jun 27, 2019 18:15होमपेज › Sangli › सरळ चाल... की ‘आधे इधर, आधे उधर’

सरळ चाल... की ‘आधे इधर, आधे उधर’

Published On: Apr 16 2019 2:21AM | Last Updated: Apr 15 2019 11:30PM
सांगली : उध्दव पाटील

जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजप नेत्यांमधील गटबाजी सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ती प्रकर्षाने उफाळून वर आली. मात्र सध्या गट-तट बाजूला ठेवून नेतेमंडळी आपापल्या आघाडी आणि महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. मात्र तरीही मनी संशय कायम आहे. नेत्यांची चाल सरळ राहणार की ‘आधे इधर, आधे उधर’ याप्रमाणे विभागली जाणार याबाबत कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम दिसतो आहे. या निवडणुकीत जातीचे कार्ड पुढे आले आहे. चुरशीमुळे मताचे महत्त्व   वाढणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. 

सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणूक सुरूवातीला अगदीच एकतर्फी वाटत होती. काँग्रेसचे मात्तबर  काही नेते उमेदवारी टाळण्यातच ताकद खर्च करीत होते. भाजपमधून बाहेर पडलेले युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली होती. वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवारी जाहीर केली होती.  मात्र प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी झाल्या. विशाल पाटील यांनी ‘स्वाभिमानी-काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीची उमेदवारी घेतली. गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीच्या तंबूत डेरेदाखल झाले आणि सारे राजकीय वातावरणच बदलले. एकतर्फी वाटणार्‍या निवडणुकीने मोठ्या चुरशीचे वातावरण निर्माण केले आहे.

‘वसंतदादा गट’ आणि ‘डॉ. पतंगराव कदम गट’ या दोन प्रमुख गटांमध्ये जिल्ह्यातील काँग्रेस विभागली आहे. ही गटबाजी किती धारदार आहे, हेही या निवडणुकीच्या सुरूवातीलाच दिसून आले. मात्र झाले गेले कृष्णेला मिळाले, असे म्हणत या दोन्ही गटांचे नेते एकत्र आल्याचे दिसते आहे. 

पलूस, कडेगाव आणि जत तालुक्यात काँग्रेसमध्ये प्रामुख्याने कदम गटाचा वरचष्मा आहे. खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात ताकदीनुसार कार्यकर्ते आहेत. या सर्व तालुक्यांमध्ये कदम गटाचे नेते, कार्यकर्ते विशाल पाटील यांची ‘बॅट’  घेऊन मैदानात उतरले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या जीवात जीव आला आहे.  तरी मतदानाच्या दिवसापर्यंत हा संशय ‘मनी’ कायम राहणार असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीत ‘करेक्ट कार्यक्रम’ या शब्दाचा मोठाच बोलबाला आहे. मात्र यावेळी ‘सरळ कामा’ चे फर्मान  निघाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र ‘सरळ काम’ ताकदीने होणार की ढिलाईने हेही या चुरशीच्या निवडणुकीत अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. 

माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनाही मुख्यमंत्र्यांनी विश्‍वासात घेतले आहे. आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिलराव बाबर,  अजितराव घोरपडे,  जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख ही सारी मंडळी नाराजीचा सूर बाजूला ठेवून एका तालात संजय पाटील यांच्या प्रचारात मताधिक्याचा राग आळवू लागले आहेत. ‘आत-बाहेर’ काहीही नाही. पक्षाचेच काम करायचे आहे, असा स्पष्ट ‘मेसेज’ त्यांनी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविलेला आहे. तशा पद्धतीने प्रचाराचे कामही सुरू झाले आहे. मात्र तरिही ‘संशय का मनी आला’ हे गीत अधूनमधून ऐकू येते आहेच.

वंचित बहुजन आघाडीतून  पडळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीत विलक्षण चुरस निर्माण झाली. पडळकर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत चुणूक दाखवून दिली आहे. निवडणुकीत जातीच्या कार्डने चांगलाच रंग भरला आहे. 

सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत पैशांचा वापर फारसा दिसून येत नाही. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये तसे दिसून आलेले आहे. मात्र यावेळी मोठी चुरस आहे. चुरशीच्या लढतीमुळे मताचे महत्व मात्र वाढणार असल्याचेही स्पष्ट संकेत आहेत.

एकीने प्रचाराला गती 

लोकसभा निवडणुकीतील पक्षाला विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान किती झाले याचा आधार विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवेळी घेतला जाईल, असा इशारा देत पक्षासाठी नीट काम करण्याचे आदेश भाजपमध्ये वरिष्ठांनी दिले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष, दोन आमदार आणि काही पदाधिकार्‍यांनी खासदार संजय पाटील यांची उमेदवारी कापण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून सर्वांना एका झेंड्याखाली आणले.