Fri, Aug 23, 2019 15:47होमपेज › Sangli › सांगली जिल्ह्यात उसापेक्षा द्राक्षे गोड

सांगली जिल्ह्यात उसापेक्षा द्राक्षे गोड

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 27 2018 11:05PMसांगली : उध्दव पाटील

सांगली जिल्हा शेतीप्रधान आहे. ऊस पिकाचा बोलबाला मोठा आहे. पण जिल्ह्यात उसापेक्षा द्राक्षे ‘गोड’ बनली आहेत. द्राक्ष हे सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे पीक बनले आहे. जिल्ह्याचे उसाचे उत्पन्न 3 हजार कोटी रुपये आहे, तर द्राक्षाचे उत्पन्न जवळपास पाच हजार कोटींच्या घरात गेले आहे.  युरोपियन राष्ट्रांसह एकूण वीसहून अधिक देशांमध्ये सांगलीची द्राक्षे निर्यात होत आहेत. देशांतर्गत बाजारपेठेतही रेसिड्यु फ्री द्राक्षे, बेदाण्याला मागणी वाढत आहे. त्यानुसार पुरवठा करण्याची सिद्धता शेतकर्‍यांनी केल्यास द्राक्ष खपात मोठी वाढ होईल व दरही चांगला मिळेल. 

ऊस हे जिल्ह्याचे प्रमुख नगदी पीक मानले जाते. पश्‍चिम भागात उसाचे पीक मुबलक आहे. कृष्णा, वारणा नदीच्या मुबलक पाण्यामुळे उसाची ही मुबलकता आहे. पण जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागात उसासारखे जादा पाण्याचे पीक परवडत नाही. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यात द्राक्ष पिकांसाठीचे  प्रयोग झाले. तासगाव तालुका तर त्यामध्ये अग्रणी राहिला. कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून द्राक्षाची गोडी वाढली.  क्षेत्र वाढले. ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ आदी योजनांखालील सिंचन क्षेत्र  वाढू लागले  तसे द्राक्ष क्षेत्रही वाढू लागले आहे.  दुष्काळी शेतकर्‍यांच्या जीवनात द्राक्षामुळे  ‘गोडवा’ आला आहे. 

काळी, लाल-गुलाबी द्राक्षेही 

तासगाव, कवठेमहांकाळ, जत, मिरज, खानापूर, पलूस, आटपाडी आदी तालुक्यात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.  सुमारे एक लाख एकर क्षेत्रावर द्राक्षबाग आहे. सुपर सोनाका, सोनाका, माणिक चमन, तास-ए-गणेश, थॉमसन या द्राक्ष जातींबरोबरच कृष्णा सिडलेस, शरद सिडलेस, ज्योती सिडलेस ही काळी द्राक्षे, लाल-गुलाबी फ्लेम द्राक्षांचे देखील उत्पादन होते.  द्राक्ष उत्पादनात सांगली  अग्रेसर जिल्हा आहे. 

12 लाख क्विंटल उत्पादन; परकीय चलन मिळवून देणारे पीक

जिल्ह्यात वार्षिक 12 लाख क्विंटल द्राक्ष उत्पादन होते. देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाचा खप मोठा आहे. परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पीक म्हणून देखील द्राक्षाची ओळख आहे. युरोपमधील 16 ते 17 राष्ट्रांमध्ये दरवर्षी द्राक्षाची निर्यात होते. ‘रेसिड्यू फ्री’ची कडक कसोटी पार करून ही निर्यात होत आहे. सन 2016 मध्ये 6737 टन, सन 2017 मध्ये 8 हजार 887 टन आणि सन 2018 मध्ये 8 हजार 145 टन द्राक्षे युरोपियन राष्ट्रांमध्ये निर्यात झाली आहेत. अजूनही जत तालुक्यातील काही गावांमधून निर्यात सुरू आहे. दुबई, चीन, रशिया, मलेशिया, सिंगापूर आदींमध्ये  द्राक्षांची निर्यात मोठी आहे. युरोपियन राष्ट्रांमध्ये होणारी निर्यात कृषी विभागाकडे आहे, मात्र अन्य राष्ट्रांमधील द्राक्ष निर्यातीची  आकडेवारी कृषी विभागाकडे नाही. 

प्रि-कुलिंग, कोल्डस्टोअरेजची साथ लाभल्यास शेतकर्‍यांना लाभ

द्राक्ष काढणीच्या वेळी व्यापारी ठरवतील तो दर घेण्याशिवाय  गत्यंतर नसते. यावर्षी द्राक्षाला चार किलोच्या पेटीला 140 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत दर मिळाला.  हंगामात दर पडतात,  हंगाम संपला की दर वाढू लागतात.  आता द्राक्षाचे दर वाढू लागले आहेत. त्यामुळे प्रि-कुलिंग, कोल्डस्टोअरेजची साथ लाभल्यास शेतकर्‍यांना  चांगला दर मिळेल. कोल्डस्टोअरेजमध्ये तीन-तीन महिने द्राक्षे जशीच्या तशी राहतात. दराच्या प्रतिक्षेत व्यापारी कोल्डस्टोअरेजमध्ये द्राक्षे ठेवतात. हवामान, पाऊस-पाण्याचा अंदाजही आता चार -आठ दिवस अगोदर कळू लागला आहे. द्राक्ष काढणीच्या काळात पाऊस वगैरे होणार असेल तर तत्पूर्वीच बागेतून द्राक्षे काढून ती प्रि-कुलींग, कोेल्डस्टोअरेजमध्ये ठेवली तर नुकसान टळेल. मात्र त्यासाठी माफक दरात प्रि-कुलींग, कोल्डस्टोअरेेेेजची व्यवस्था होणे आवश्यक आहे. 

रेसिड्यु फ्री द्राक्ष, बेदाणा वाढेल

‘रेसिड्यु फ्री’ द्राक्षालाच युरोपात प्रवेश दिला जातो. युरोपमधील ही जागृती देशातील लोकांमध्येही आहे.  द्राक्ष, बेदाणा रेसिड्यु फ्री असेल तर जादा रक्कम देऊन तो खरेदी करण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे यापुढे रेसिड्यु फ्री द्राक्ष, बेदाण्याला नजिकच्या भविष्यात देशातही चांगली मागणी राहील.  त्यासाठी शेतकर्‍यांनी सज्ज असले पाहिजे. 

फसवणुकीवर हवी उपाययोजना

दरम्यान,  हंगामामध्ये दलालांचा सुळसुळाट असतो.  दलाल किंवा  खरेदीदार प्रथम रोखीने द्राक्षे खरेदी करतात. शेतकर्‍यांचा विश्‍वास संपादन करतात. त्यानंतर द्राक्षे खरेदी करून पैसे बुडवणे असे प्रकार दरवर्षीच घडतात. यासाठी उपाययोजना आवश्यक आहेत.

Tags : sangli, sangli news, Grapes sugarcane issue,