होमपेज › Sangli › द्राक्षबाग कोसळून आठ लाखांचे नुकसान

द्राक्षबाग कोसळून आठ लाखांचे नुकसान

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 15 2018 12:04AM

बुकमार्क करा
तासगाव : प्रतिनिधी 

रविवारी पहाटे सुटलेल्या वादळी वार्‍यामुळे तालुक्यातील मणेराजुरी येथील साहेबराव शामराव चव्हाण यांची एक एकर द्राक्षबाग कोसळून जमीनदोस्त झाली. यामुळे चव्हाण यांचे अंदाजे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

गावापासून काही अंतरावर असलेल्या चिमणखोरी मळ्यात चव्हाण यांची सुपर सोनाका जातीची एक एकर द्राक्षबाग आहे. रविवारी पहाटे अचानक वादळी वारे वाहू लागले. त्यामुळे द्राक्षांच्या स्टेजिंगचा तोल बिघडला आणि द्राक्षांचे वजन न झेपल्यामुळे संपूर्ण बाग कोसळून जमीनदोस्त झाली. 

एक एकर क्षेत्रावरील या बागेत द्राक्षांचा हंगाम बहरला होता. चव्हाण यांना बागेतून साधारणपणे 15 ते 20 टन उत्पादन अपेक्षित होते. त्यामुळे सुमारे  8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षे फेकून देण्याची वेळ चव्हाण यांच्यावर आली आहे. आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी आशा चव्हाण यांनी केली आहे. 

सरपंच सदाशिव कलढोणे यांनी द्राक्षबागेची पाहणी करून माहिती महसूल प्रशासन आणि तालुका कृषि विभागाला दिली. तलाठी ए. एस. ताटे आणि कृषि सहायक रमेश खरमाटे यांनी चव्हाण यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतली.