होमपेज › Sangli › द्राक्षबागांच्या दुबार छाटणीची वेळ 

द्राक्षबागांच्या दुबार छाटणीची वेळ 

Published On: May 21 2018 1:05AM | Last Updated: May 20 2018 8:08PMमांजर्डे : वार्ताहर

तासगाव तालुक्यात गारपीट व जोरदार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांवर द्राक्षबागांची दुबार छाटणी घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे याआधी  केलेला लाखो रुपयांचा छाटणीचा खर्च वाया गेला आहे. पुढील हंगामाच्या तयारीसाठी पुन्हा खर्च करावा लागत आहे.या नुकसानीची पाहणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली.तालुक्यातील येळावीसह आरवडे, हातनूर, डोर्ली, गोटेवाडी, विसापूर या भागाला गेल्या दोन-तीन दिवसांत गारपीट व जोरदार पावसाने झोडपले होते. त्यामुळे   द्राक्षबागा, डाळिंब, ऊस, भाजीपाला, फुलबागा, घरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना यामुळे जोरदार फटका बसला आहे.पाणी टंचाईमुळे आगाप छाटणी घेऊन बागेची काडी तयार करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांना या पावसामुळे जोरदार धक्का बसला आहे.काडी तयार करण्यासाठी खते, महागडी औषधे, मजुरी यासाठी केलेला खर्च वाया गेला आहे.

पावसाबरोबरच गारांनी द्राक्ष बागांना झोडपून काढल्यामुळे काड्या मोडून पडल्या आहेत. पाने फाटली आहेत. त्यामुळे पुढील हंगामात काडी तयार होऊन माल येईल याची खात्री नाही. त्यामुळे अनेकांनी बागांची पुन्हा छाटणी घेण्यास सुरुवात केली आहे.परंतु दुबार छाटणी घेऊन काडी तयार होणार का, पुढील हंगामात माल येणार का, यासाठी आवश्यक असणारे पैसे कसे उभे करायचे असे अनेक प्रश्न शेतकर्‍यांना सतावत आहेत. तरीही द्राक्षबाग पुन्हा उभी करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत.

पीक विमा देण्याची मागणी

निसर्गाच्या लहरीमुळे तालुक्यातील हजारो हेक्टर द्राक्षशेतीचे नुकसान झाले आहे. द्राक्ष उत्पादकांनी कर्ज काढताना त्यांच्याकडून सक्तीने पीक विमा भरून घेतला आहे. त्याचा विमा तात्काळ देण्याची मागणी केली आहे.

विम्याच्या निकषात बदल करा 

तालुक्यात पाऊस व गारपिटीमुळे द्राक्ष शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकर्‍यांना कर्ज काढतानाच विमा भरण्याची सक्ती केली जात आहे. या हवामानावर आधारित पीक विम्याच्या निकषात बदल करून तात्काळ विम्याचे पैसे शेतकर्‍यांना द्यावेत, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन उभारेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. यावेळी अशोक खाडे, जोतिराम जाधव, महेश जगताप, वैभव गुरव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.