Sat, Jul 20, 2019 14:59होमपेज › Sangli › नुकसान २६ कोटींचे; पंचनामा ४७ लाखांचा

नुकसान २६ कोटींचे; पंचनामा ४७ लाखांचा

Published On: Jun 03 2018 1:19AM | Last Updated: Jun 02 2018 8:13PMतासगाव : प्रतिनिधी

वादळ, अवकाळी पाऊस व तुफान गारपिटीच्या तडाख्याने नुकसान झालेल्या द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांना शासनाने सुलतानी झटका दिला आहे. 265 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांचे तब्बल 26 कोटी रुपयांचे नुकसान झाले.  प्रशासनाने मात्र केवळ 47 लाख रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत.

द्राक्षबागांचे हेक्टरी सरासरी 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे; परंतु शासन नियमानुसार हेक्टरी 18 हजार रुपये नुकसान गृहित धरून पंचनामे केले  आहेत, अशी  माहिती तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे यांनी दिली. दि.15 ते 17 मे दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे येळावी, बोरगाव, विसापूर, हातनोली, हातनूर, आरवडे, पुणदी, गोटेवाडी, धामणी आणि चिंचणी या  गावांतील द्राक्षबागा, आंबा, डाळिंब, केळी अशी पिके आणि घरांचे फार मोठे नुकसान झाले आहे.  शेतकर्‍यांनी कष्टाने तयार केलेल्या द्राक्षकाडीवर गारांचा मारा बसला आहे. या काडीला द्राक्षे येण्याची शक्यता नसल्याने दुबार खरड छाटणी करण्याची वेळ आली आहे. 

तालुका कृषी अधिकारी आर. बी. शिंदे,  मंडल कृषी अधिकारी आर. आर. खरमाटे, कृषी पर्यवेक्षक सचिन दाभोळे, कृषी सहाय्यक सी. के. पाटील, मंडल अधिकारी रमेश पवार,  तलाठी शशिकांत ओमासे यांनी तातडीने पंचनामे केल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पंचनामे करताना तालुका कृषी विभागाने 2015 ला शासनाने काढलेल्या आदेशाचा आधार घेतला आहे. 
अवकाळी पाऊस व गारपिटीने फळबागांचे नुकसान झाल्यास हेक्टरी 18 हजार रुपयांप्रमाणे नुकसानीचे पंचनामेे करावेत, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे  तालुक्यात द्राक्षबागांचे 46 लाख 72 हजार 160 रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनामे शासनाकडे सादर केले आहेत.

अधिवेशनात आवाज उठविणार : आ. पाटील

आमदार सुमनताई पाटील म्हणाल्या, गारपिटीमुळे तालुक्यातील द्राक्षबागा व द्राक्षबागायतदार  शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. हेक्टरी सरासरी 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने केवळ हेक्टरी 18 हजार रुपये  नुकसान झाल्याचे पंचनामे करुन द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांची चेष्टा केली आहे. याविरोधात अधिवेशनात मी आवाज उठविणार आहे. द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांना हेक्टरी 10 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करणार आहे.