Wed, Nov 21, 2018 22:03होमपेज › Sangli › रोगांच्या तडाख्याने उतरले द्राक्षांचे दर

रोगांच्या तडाख्याने उतरले द्राक्षांचे दर

Published On: Dec 11 2017 1:34AM | Last Updated: Dec 10 2017 8:56PM

बुकमार्क करा

लिंगनूर : प्रवीण जगताप

जिल्ह्यासह  मिरज पूर्व भागात द्राक्ष हंगाम सुरू होऊन महिना लोटला आहे. दर्जेदार द्राक्षांना प्रारंभी 360 रुपयांचा दर मिळाला, हे जरी खरे असले तरी रोगांच्या तडाख्यात यंदा अनेक बागा सापडल्या आहेत. त्यांचा दर दर्जा कमी असल्याने घसरत चालले आहेत. तर काही ठिकाणी व्यापारी हवामान, घडांचा दर्जा असे कारण देऊन त्याचा गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे हे दर आता 195 ते 210 रुपये प्रति चार किलो इतके घसरले आहेत.

यंदा ऑगस्ट, सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्येसुद्धा पाऊस पडत राहिला. खराब वातावरण राहिल्याने दावण्या, फळकुज, करपा अशा रोगांनी द्राक्षघड बाधित झाले होते. त्यामुळे अनेकांना घड काढून टाकणे अथवा आहे त्या स्थितीत शक्य तितके औषधे फवारून रोग नियंत्रण करणे असे पर्याय उत्पादकाला निवडावे लागले आहेत. त्यामुळे यंदा शेकडो हेकटर क्षेत्रात एकरी उत्पादन घटले आहे. अनेकांना द्राक्ष काढणी करताना उत्पादन घटल्याचे दिसून येते  आहे. व्यापारीसुद्धा रोगाने बाधित घड काढणीवेळी मागे सोडत आहेत. त्यामुळे पेटीचा उतारा कमी होत आहे. त्यामुळे अनेकांना यंदाचा द्राक्ष हंगाम तोट्यात तर काहींना ना नफा ना तोटा  याप्रकारेच पावत आहे.  सलगरे येथील एका उत्पादकाने माझे गतवर्षी एका एकरात चार हजार पेटी माल उत्पादन झाले, मात्र यंदा केवळ एक हजार पेटीच माल निघाल्याचे त्यांनी सांगितले.