Thu, Jun 20, 2019 02:14होमपेज › Sangli › बंद होणार्‍या 5 शाळांना दिला ‘अ’ दर्जा

बंद होणार्‍या 5 शाळांना दिला ‘अ’ दर्जा

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 8:46PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

कमी गुणवत्तेमुळे विद्यार्थी संख्या घसरत असल्याकडे लक्ष वेधत शासनाने दहा व त्याहून कमी पटाच्या शाळा बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. जिल्ह्यातील 16 शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांचे नजिकच्या शाळेत समायोजनाच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान शासनाने ‘शाळासिद्धी’मध्ये ‘अ’ दर्जाच्या शाळांची नावे प्रसिद्ध करून त्यांचे अभिनंदन केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील बंद करायच्या यादीतील 5 शाळांचा समावेश आहे. यातून शासनाचा विरोधाभास स्पष्ट होत आहे ‘राज्यात पालकांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेबाबत चांगलीच जागरुकता आली आहे. 

त्यामुळे चांगली गुणवत्ता असलेल्या शाळांमध्ये पटसंख्या वाढत आहे. कमी गुणवत्तेच्या शाळांमधील पटसंख्या कमी होत आहे. ‘आरटीई’च्या तरतुदींचे उल्लंघन न करता कमी पटाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे नजिकच्या चांगल्या गुणवत्तेच्या शाळेत समायोजन करावे’, असे निर्देश शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेले आहेत. 

त्यानुसार राज्यातील सुमारे 1300 प्राथमिक शाळांवर गंडांतर आले आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 16 शाळांचा समावेश आहे. या शाळा बंद करून विद्यार्थी व शिक्षकांचे नजिकच्या शाळेत समायोजन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

शासनाने शाळांची गुणवत्ता प्रमाणित करण्यासाठी केंद्राचा शाळासिद्धी कार्यक्रम सुरू केला आहे. विविध निकषांवरून स्वयंमुल्यांकनाद्वारे शाळांची श्रेणी निश्‍चित केली आहे. जिल्ह्यातील 2983 शाळांपैकी 1231 शाळा ‘अ’ श्रेणीत असल्याचे शासनाने नमूद केले आहे. त्यामध्ये दहा व त्याहून कमी पटामुळे बंद करावयाच्या 5 शाळांचाही समावेश आहे. कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या घसरल्याकडे शासन लक्ष वेधत आहे. तर याच शाळा गुणवत्तेवरून ‘अ’ श्रेणीत आल्याचे जाहीर करत आहे. त्यांचे जाहीर अभिनंदनही करत आहे.  त्यातून शासनाचा विरोधाभास समोर येत आहे.