Sun, Jun 16, 2019 11:58
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › नातवाच्या अपहरणाचा धसका; आजीचा मृत्यू

नातवाच्या अपहरणाचा धसका; आजीचा मृत्यू

Published On: Dec 21 2017 1:51AM | Last Updated: Dec 20 2017 11:35PM

बुकमार्क करा

माडग्याळ : वार्ताहर    

अंकलगी (ता. जत)  येथील बेपता युवक राघवेंद्र संगाप्पा अक्‍कलकोट (वय 32) याचे दोन महिन्यांपूर्वी गावातून अपहरण होते. त्याचा धसका घेऊन त्यांची आजी गौरव्वा शिवमूर्ती आरळी (वय 75) यांचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला.पोलिसांनी राघवेंद्रचा तपास अद्याप न लावल्याने गौरव्वा यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कार उमदी पोलिस ठाण्यासमोर करण्याचा इशारा नातेवाईकांनी दिल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

दि. 26 ऑक्टोबर रोजी राघवेंद्र अक्‍कलकोट हा तानाजी चिदानंद कोळी याच्याबरोबर मोटारसायकलवरून संखला गेला होता. त्यानंतर तो गायब झाला होता. राघवेंद्रची आई कलव्वा अक्कलकोट यांनी  दि. 30 ऑक्टोबररोजी उमदी पोलिसांत तो हरविल्याची फिर्याद दिली होती. 

पोलिसांनी तानाजी कोळी याच्याकडे चौकशी केली. कोळी याने राघवेंद्र हा मुकादम म्हाळाप्पा मलकाप्पा याच्या ताब्यात आहे, असे  सांगितले होते. त्यानंतर दि.11 नोव्हेंबर रोजी उमदी पोलिसांनी तानाजी व म्हाळाप्पा यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती. त्यानंतर दोघेही जामिनावर सुटले होते. अंकलगी येथील ग्रामस्थांनी उमदी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. संशयितांनातात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी  करण्यात आली होती.

उमदी पोलिसांनी पक्षपातीपणे तपास केला. संशयिताला मोकाट सोडले असे ग्रामस्थांचे व नातेवाईकांचे म्हणणे आहे. गेला महिनाभर राघवेंद्रची आजी गौरव्वा आरळी यांनी अन्‍नत्याग  केल्यामुळे मंगळवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यामुळे अंकलगीतील संतप्त ग्रामस्थांनी गौरव्वाचा मृतदेह उमदी पोलिस ठाण्यासमोर नेण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे उमदी पोलिसांची तारांबळ उडाली. बुधवारी सकाळी उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे व पोलिस अंकलगी येथे घटनास्थळी पोहोचले. 

जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी नागनाथ वाकुडे घटनास्थळी येऊन निवेदन स्वीकारत नाहीत तोपर्यत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. उमदी पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर निवेदन देण्यात आले. त्यानंतर गौरव्वा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे म्हणाले़, म्हाळाप्पा मलकाप्पा  हा संशयित जामिनावर सुटलेला आहे. अटकेत असलेला दुसरा संशयित तानाजी कोळी याच्या नार्कोटेस्टसाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे.