Sun, Aug 18, 2019 21:31होमपेज › Sangli › ग्रामसेवक-अधिकारी चर्चेच्या फेर्‍या निष्फळ

ग्रामसेवक-अधिकारी चर्चेच्या फेर्‍या निष्फळ

Published On: Dec 12 2017 2:09AM | Last Updated: Dec 11 2017 11:29PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

ग्रामसेवक युनियन, संघ आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्यातील वादावर सोमवारी चर्चेच्या पाच-सहा फेर्‍या झाल्या.  मात्र युनियन आणि संघाने आडसुळ यांची बदली किंवा त्यांना रजेवर पाठविण्याची मागणी कायम ठेवली आहे. असहकार सुरू राहील व शुक्रवारचा मोर्चा निघेल, असे संघटना पदाधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीत हयगय चालणार नाही, असा इशारा देत मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी पवित्रा स्पष्ट केला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी ग्रामसेवक युनियन आणि ग्रामसेवक संघाच्या शिष्टमंडळाला चर्चेला बोलविले होते. समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ तसेच युनियनचे जिल्हाध्यक्ष भास्कर जाधव, जिल्हा सरचिटणीस श्रीधर कुलकर्णी, ग्रामसेवक संघाचे नेते विजय मस्कर, जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, युनियनचे आर. डी. पाटील, संपत माळी व पदाधिकारी उपस्थित होते. 

ग्रामसेवक युनियन, संघाच्या मागण्या, आरोप-प्रत्यारोप यावर चार-पाच तास बैठक झाली. चर्चेच्या अनेक फेर्‍या झाल्या. वादावर समेट घडेल, असे संकेत मिळत होते. मात्र ग्रामसेवक युनियन आणि संघाने आडसूळ यांची बदली किंवा त्यांना रजेवर पाठविण्याची मागणी कायम ठेवली. अनेक दिवस प्रश्‍न प्रलंबित आहेत. ग्रामसेवकांची पिळवणूक झालेली आहे. ग्रामसेवक आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातील वातावरण कलुषित झाले आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली काम करता येणार नाही. त्यामुळे बदली किंवा रजा याशिवाय असहकार आंदोलन मागे घेतले जाणार नाही. लोकांची कामे केली जातील. मात्र पंचायत समितीच्या मिटींगवर बहिष्कार राहिल. अहवाल पाठविले जाणार नाहीत, असे संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. 

मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत म्हणाले, ग्रामसेवक पुरस्काराचा मुद्दा वगळता अन्य मुद्दे जवळपास निकालात निघालेले आहेत. ग्रामसेवक पुरस्कार निवडी आणि वितरण कार्यक्रम फेब्रुवारीत घेतला जाईल. आश्‍वासित प्रगती योजनेंतर्गत 107 ग्रामसेवकांना जुलैमध्येच लाभ दिलेले आहेत. उर्वरीत दहा-वीस ग्रामसेवकांच्या लाभाचा प्रश्‍नही निकालात निघेल. तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केलेल्या सर्व कंत्राटी ग्रामसेवकांना सेवेत नियमित केलेले आहे. 42 कंत्राटी ग्रामसेवकांच्या अनामत रकमा दिलेल्या आहेत. चार कंत्राटी ग्रामसेवकांचे प्रस्ताव ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये आलेले आहेत. तेही लवकरच निकाली निघतील. ग्रामसेेवकांच्या मागण्यांबाबत प्रशासन यापुढेही दक्ष राहिल. मात्र शासनाच्या योजनांमध्ये हयगय चालणार नाही. सौभाग्य योजना केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. त्याचे काम करावेच लागेल. 

दरम्यान, ग्रामसेवक संघटना आणि अधिकारी यांच्यातील वादावर समेट घडवून आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख बुधवारी बैठक घेणार आहेत.