होमपेज › Sangli › खानापूर तालुक्यातील चार गावांतील ग्रा.पं. निवडणुकीत 82 टक्के मतदान 

खानापूर तालुक्यातील चार गावांतील ग्रा.पं. निवडणुकीत 82 टक्के मतदान 

Published On: May 28 2018 1:36AM | Last Updated: May 27 2018 10:19PMविटा : प्रतिनिधी

खानापूर तालुक्यात चार ग्रामपंचायतीत पंचवार्षिक निवडणुकीत एकूण 81.79 टक्के मतदान झाले. भेंडवडे येथील किरकोळ मारामारीचा प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. भेंडवडे, राजधानी भेंडवडे, साळशिंगे  आणि देवनगर  या चार ग्रामपंचायतीसाठी आणि रामनगर येथील एका पोटजागेसाठी मतदान झाले. यावेळी  काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती झाल्या. या निवडणुका प्रामुख्याने राजकीय पक्ष्यांपेक्षा स्थानिक गट तटातच होत असल्याने कमालीची चुरस पहायला मिळाली. 

भेंडवडे येथे सरपंचपदासाठी तीन आणि  सदस्य पदाच्या नऊ जागांसाठी तब्बल 25 उमेदवार रिंगणात आहेत. या गावात तिरंगी लढत होती. येथे राष्ट्रवादीचे किसनराव जानकर आणि स्थानिक आघाडीचे राजू जानकर या दोघा पॅनेल प्रमुखांना किरकोळ मारामारी केल्याबद्दल विटा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या गावात एकूण 77.11 टक्के मतदान झाले. येथे 1 हजार 586 पैकी 1 हजार 223 मतदारांनी आपला हक्क बजावला. यात 597 महिला आणि 626 पुरुषांचा समावेश आहे . राजधानी भेंडवडेत एकूण 7 पैकी एक जागा बिनविरोध झाली होती. उरलेल्या 6 जागांसाठी 12 जण रिंगणात होते. येथे दोन गटांत दुरंगी लढत आहे. या ठिकाणी एकूण 87.26 टक्के मतदान झाले. येथे 259 पैकी 226 इतके मतदान झाले.  यात 115 महिला आणि 111 पुरुषांचा समावेश आहे.

साळशिंगेत दुरंगी लढत आहे. येथे सरपंचपदासाठी दोन तर सदस्य पदासाठी 18 जण रिंगणात आहेत. या गावात एकूण 84.77 टक्के मतदान झाले. येथे 1 हजार 878 पैकी 1 हजार 592 इतके मतदान झाले.  यात 775 महिला आणि 821 पुरुषांचा समावेश आहे. तालुक्यातील देवनगर येथे सदस्य पदाच्या सर्व या सर्व म्हणजे 7 जागा बिनविरोध झाल्या आहेत.  मात्र सरपंचपदासाठी तिरंगी लढत आहे. या ठिकाणी एकूण 83.40 टक्के मतदान झाले. येथे 470 पैकी 392 इतके मतदान झाले.  यात 194 महिला आणि 198 पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, तालुक्यातील रामनगर  ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी तब्बल चारजण रिंगणात होते. येथे एकूण 79.07 टक्के मतदान झाले. येथे 129 पैकी 102 मतदान झाले.  यात 53 महिला आणि 49 पुरुषांचा समावेश आहे.