होमपेज › Sangli › आटपाडीत सेना-भाजप, शिराळ्यात काँग्रेस, कवठेमहांकाळात राष्ट्रवादी

आटपाडीत सेना-भाजप, शिराळ्यात काँग्रेस, कवठेमहांकाळात राष्ट्रवादी

Published On: May 29 2018 1:31AM | Last Updated: May 28 2018 11:41PMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील    71  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 37 ठिकाणच्या पोटनिवडणुकीसाठी  सोमवारी  मतमोजणी झाली. शिराळ्यात काँग्रेसने, आटपाडीत सेना- भाजपने तर कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकत बाजी मारली.  जत, पलूसमध्ये काँग्रेसला तर खानापूर तालुक्यात सेनेला सर्वाधिक ग्रामपंचायतींत सत्ता मिळाली.जिल्ह्यात 82 ग्रामपंचायतींपैकी  11 ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली होती. उर्वरित 71 ग्रामपंचायतींसाठी  रविवारी चुरशीने 82 टक्के मतदान झाले होते. मतमोजणीसाठी सकाळीच कार्यकर्ते तालुक्यातील मतमोजणी केंद्रावर जमा झाले होते. निकाल जाहीर होतील तशी विजयी उमेदवारांच्याकडून गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी होत होती. 

शिराळा तालुक्यात सर्वाधिक 25 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. त्यात काँग्रेसने सर्वाधिक म्हणजे 10 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवली. तर राष्ट्रवादीला 8 ठिकाणी सत्ता मिळाली आहे. तालुक्यात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने बाजी मारली. माजी आमदार मानसिंग नाईक यांच्या गटानेही जोरदार लढत दिली. भाजप नेते आमदार शिवाजीराव नाईक गटाला सहा गावात यश मिळाले. मनसेला एका ठिकाणी सत्ता मिळाली. 

कवठेमहांकाळ तालुक्यात 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आमदार सुमनताई पाटील, महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री घोरपडे यांच्या गटाबरोबर आघाडी केली होती. त्यात राष्ट्रवादीला 6 ठिकाणी तर घोरपडे गटाला 4 ठिकाणी सत्ता मिळाली.  काही गावात घोरपडे गट विरुद्ध राष्ट्रवादी अशीही लढत झाली. खासदार पाटील गटाने   चार गावात बाजी मारली.  

आटपाडी तालुक्यात पंधरापैकी भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी सहा ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविला.  कँाग्रेसने दोन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या.विभुतवाडीत भाजप-सेनेच्या संयुक्त आघाडीने सत्ता मिळविली.  आटपाडीत नगरपरिषदेसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी सुद्धा सरपंच पदाच्या प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेने भाजप विरोधात   दणदणीत मात करत सरपंचपद पटकाविले. सेनेच्या तानाजी पाटील गटाने करगणी, दिघंची आणि खरसुंडी या मोठ्या गावातील ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली.  भाजपने निंबवडे,काळेवाडी,मापटेळा,भिंगेवाडी,बनपुरी, मासाळवाडी या ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. नेलकरंजी आणि मानेवाडी या ग्रामपंचायतींवर कँाग्रेसने सत्ता मिळविली. 

कडेगाव तालुक्यातील चिंचणी  येथील ग्रामपंचायतीत   काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवीत  बालेकिल्ला अबाधित राखला.   13 पैकी 12 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले; तर  केवळ एका जागेवर भाजपला समाधान मानावे लागले. पलूस तालुक्यातील आमणापुर आणि विठ्ठलवाडी या दोन ठिकाणच्या  निवडणुकीत  काँग्रेस पक्षाने  यश मिळवत विरोधकांचा सुफडासाफ केला. राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशिल असलेल्या या दोन गावांंमध्ये काँग्रेस  आणि राष्ट्रवादी पक्षांत  लढत झाली. त्यात काँग्रेसने बाजी मारली. खानापूर तालुक्यात  चार ग्रामपंचायती  निवडणुकीत आमदार अनिल बाबर यांच्या शिवसेना गटाला दोन तर काँग्रेसला एक आणि स्थानिक टायगर ग्रूपला एक ठिकाणी सत्ता मिळाली. 

आमदार विलासराव जगताप यांना धक्‍का

जत तालुक्यात चार ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्यात काँग्रेसला तीन तर भाजपला एक ठिकाणी सत्ता मिळाली. भाजपचे आमदार विलासराव जगताप यांना या निवडणुकीत धक्‍का बसला. त्यांच्या कोंत्यावबोबलाद गावामध्ये त्यांच्या गटाची  40 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. येथे काँग्रेसने थेट संरपचपदासह 6 जागा जिंकत सत्ता मिळविली. भाजपला 3 जागावर समाधान मानावे लागले.  काँग्रेस नेते विक्रमसिंह सावंत यांच्या गटाने उमदीसह गुलगुजनाळ, कोंत्याव बोबलाद या गावात सत्ता मिळविली.