Wed, Jul 24, 2019 14:31होमपेज › Sangli › जत तालुक्यात राजकीय वातावरण तापले   

जत तालुक्यात राजकीय वातावरण तापले   

Published On: Apr 30 2018 1:46AM | Last Updated: Apr 29 2018 8:44PMयेळवी : विजय रुपनूर 

जत तालुक्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक आणि रिक्त जागांकरिता पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. कोंतेवबोबलाद, गुलगुंजनाळ, कोणबगी, खिलारवाडी, बिळूर या पाच गावांत सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या गावात सरपंचांची थेट निवड होणार असल्याने या निवडणुकीस महत्व प्राप्त झाले आहे. उमदी गावाने अप्पर तहसीलदार कार्यालय तिथे व्हावे याकरिता गेल्या निवडणुकीत बहिष्कार टाकला होता. आता तिथे कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष  आहे. 

कुलाळवाडी, एकुंडी, अमृतवाडी, धुळकरवाडी, अंकलगी या गावांत प्रत्येकी एका जागेकरिता पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. याकरिता निवडणूक विभागाने तयारी केली आहे. मतदारांची कच्ची यादी तयार केली आहे. संवेदनशील म्हणून  घोषित असणार्‍या गावांवर पोलिस यंत्रणेचे विशेष लक्ष असणार आहे 

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने काही गावात हालचाली सुरू आहेत. ते  प्रयत्न कितपत यशस्वी होणार ते दि. 16 मे रोजी समजणार आहे. या निवडणुकीत पाणी प्रश्न, प्रलंबित विकासकामे या मुद्यावर  आधारित प्रचार होणार असे दिसते आहे.

गावस्तरावरील निवडणूक नेहमीच अतिशय चुरशीने होत असते. कुरघोडी, भावकी, गटातटाचे राजकारण होत असते. विधानसभा व लोकसभा निवडणुकांचीही तयारी विरोधी पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळे या निवडणुकीला महत्व आहे. तालुकास्तरावरील नेत्यांचेही वर्चस्व सिध्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जनमत आजमवण्याकरिता बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांस  विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

कोंतेवबोबलाद या गावांतील निवडणूक बिनविरोध झाली होती.  बिळूर व खिलारवाडी या गावांनी सुरुवातीस म्हैसाळच्या पाण्यासाठी बहिष्कार टाकला होता. नंतर  या गावांत  ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती. उमदीत तालुका विभाजन व अप्पर तहसीलदार कार्यालय व्हावे याकरिता ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.