Fri, Jul 19, 2019 17:53होमपेज › Sangli › कृष्णाकाठी मिरचीचा ठसका

कृष्णाकाठी मिरचीचा ठसका

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 19 2018 10:18PMशहरातील हॉटेलची गरज लक्षात घेवून त्यांना लागणारी सिझलिंग हॉट या जातीची मिरची आपल्या शेतामध्ये उत्पादित करून लाखो रुपये मिळविण्याचा आणि तो प्रत्यक्षात यशस्वी करण्याचा प्रयत्न नवेखेड येथील प्रतापराव शिवाजीराव चव्हाण यांनी केला आहे. 

चव्हाण यांनी 1 एकर क्षेत्रामध्ये गादीवाफे केले. मल्चिंग पेपरचा वापर करून  मार्चमध्ये सिझलिंग हॉट  या  हिरव्या मिरचीच्या रोपांची  लावण केली. दोन फुटावर एक रोप याप्रमाणे 1  लागवड केली. बेसलडोससाठी सेंद्रिय व रासायनिक खताचा वापर केला.ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा व खतांच्या मात्रा दिल्या.  65 व्या दिवशी  उत्पादनाला सुरुवात झाली. 

या मिरचीला सध्या 32 ते 35 रुपये किलो प्रमाणे दर मिळत आहे. दर 4 दिवसांनी  तोडा होतो आहे.  एका तोडणीवेळी अडीच ते तीन टन मिरची निघत आहे. हा बहर 65 व्या दिवसापासून 5 ते 6 महिने सुरू राहणार आहे . कमीत कमी 45 ते 50 टन मिरची उत्पादित होईल, असा चव्हाण यांना विश्‍वास आहे. 5 ते 6 महिन्यात सुमारे 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असून खर्चाचा विचार करता हे उत्पादन  फायदेशीर ठरणारे आहे.  प्रतापराव चव्हाण हे हॉटेल व्यवस्थापन पदवीधर असून त्यांनी या पदावर 10 वर्षे नोकरी केली आहे.  नोकरी सोडून त्यांनी घरच्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. युवा शेतकर्‍यांनी फुले, केळी, रताळी, ढबू, कलिंगड, काकडी, पालेभाज्या अशी हुकमी उत्पादन देणारी पिके घ्यावीत. शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, संकरीत बियाणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व हंगाम निहाय बाजारपेठेचा अभ्यास करावा असे त्यांनी आवाहन केले.

विजय शिंदे