होमपेज › Sangli › सरकारी काम अन् सहा ‘वर्षे ’ थांब

सरकारी काम अन् सहा ‘वर्षे ’ थांब

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 08 2018 10:26PMसांगली : शशिकांत शिंदे

जिल्हा नियोजन मंडळाने विविध विकास कामांसाठी दिलेला निधी सहा वर्षे झाले तरी अद्याप खर्च झालेला नाही. खासदार, आमदार यांच्या विकास निधीसह विविध योजनांसाठीचा निधी संबंधित विभागाकडे  अनेक महिन्यांपासून पडून आहे. त्यामुळे ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’  ऐवजी ‘सहा वर्षे थांब’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

विकासाला चालना मिळावी, जलद गतीने कामे पूर्ण व्हावीत ही सामान्य लोकांची अपेक्षा असतेे. त्यातूनच स्थानिक पातळीपासून केंद्रापर्यंत बहुसंख्य ठिकाणी सत्ता परिवर्तन झाले. सत्ता परिवर्तन झाले तरी प्रशासन मात्र त्याच जुन्या पध्दतीने काम करीत असल्याचे दिसते आहे. ही बाब नुकत्याच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत पुढे आली. माजी नगरसेवक राजेश नाईक यांनी माजी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा विकास करण्यासाठी निधीची मागणी केली होती. त्यावर पाटील यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून 24 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. विकासकामांसाठी यातील बहुतांश निधी महापालिकेस वर्गही करण्यात आला. स्टेडियमच्या दोन्ही बाजूंना कमान करून गेट करणे, स्टेडियमचा परिसर विकसित करणे  असे नियोजन आहे. त्यापैकी एका बाजूला कमान झाली आहे. मात्र दुसर्‍या बाजूची कमान अद्याप पूर्ण झालेली नाही. स्टेडियम बंदिस्त नसल्याने परिसराची दुरवस्था झाली आहे. स्टेडियममध्ये दुर्गंधीयुक्त पाणी साचून आहे. इमारतीच्या भिंती ठिकठिकाणी पाडण्यात आल्या आहेत. हा परिसर मद्यपि आणि जुगारी लोकांचा अड्डा बनला आहे. स्वच्छतागृहाची दुरवस्था झाल्याने या ठिकाणी खेळाडूंची कुचंबणा होत आहे. 

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्टेडियमची सुसज्ज जागा आहे. त्याचा उपयोग करून घेण्याऐवजी दुर्लक्ष होत आहे. स्टेडियमच्या प्रवेशद्वाराचे वेळीच काम झाले असते तर स्टेडियमची अशी दुरवस्था झाली नसती. या निधीतील अद्यापही सुमारे साडेचार लाख रुपयांचा निधी महापालिकेकडे पडून आहे.  डॉ. आंबेडकर स्टेडियम हे असे एक  उदाहरण आहे.   इतर  अनेक शासकीय विभागातही   अशीच स्थिती आहे. 

गेल्या चार वषार्ंत खासदार संजय पाटील यांच्या निधीतून 25 कोटी रुपये निधीपैकी सुमारे 18 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. पैकी केवळ 11 कोटी  रुपये खर्च झाले आहेत. अद्याप 14 कोटी रुपयांचा निधी खर्च झालेला नाही. 

अनेक विभागातील अधिकार्‍यांनी प्रस्ताव तयार केले नसल्याने, कागदपत्रे अपूर्ण असल्याने कामे प्रलंबित आहेत. क्रीडा विभागाची अनेक कामे अपूर्ण आहेत. खासदार पाटील  यांनी  कामे  लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.