Fri, Jul 19, 2019 18:07होमपेज › Sangli › सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी : मुख्यमंत्री

सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी : मुख्यमंत्री

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वाळवा : प्रतिनिधी

राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी सातत्याने राहिले असून ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी 70-30 हा फॉर्म्युला मान्य करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. एफआरपी देण्यासाठी अडचणीच्यावेळी कारखान्यांना भरीव आर्थिक मदत केली आहे. कोणताही उपपदार्थ निर्मिती नसताना हुतात्मा कारखान्याने देशात दिलेला उच्चांकी दर कौतुकास्पद असून सर्वांनी त्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे बोलताना केले. 

पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहीर सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व  ना.चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

ना. फडणवीस यांनी क्रांतिसिंह नाना पाटील, हुतात्मा किसन अहीर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.  क्रांतिवीर नागनाथअण्णांच्या समाधीस्थळावर पुष्पचक्र वाहिले. राज्य कबड्डी असोसिएशनचा झेंडा फडकविण्यात आला. पालकमंत्री ना. सुभाष देशमुख यांनी हुतात्मा संकुलाचा झेंडा फडकविला. क्रीडा ज्योत ना. फडणवीस, ना. चंद्रकांत पाटील व वैभव नायकवडी यांनी प्रज्वलित केली. राष्ट्रीय खेळाडू वीरधवल नायकवडी यांनी खेळाडूंना शपथ दिली. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, क्रांतीवीर नागनाथअण्णांचा वारसा वैभव नायकवडी यांनी समर्थपणे चालविला आहे. ज्या मातीमध्ये देशाच्या क्रांतीचे बीजारोपण झाले. त्या क्रांतीभूमीला वंदन करायला मी आलो आहे. ते  मी माझे भाग्य समजतो. इंग्रज सरकारला हुसकावून लावून प्रतिसरकार निर्माण करून मुल्याधिष्ठित  समाज निर्माण करण्याचे कार्य अण्णांनी केले. उभारलेला कारखाना हा राष्ट्राचा आहे. समाजाची संपत्ती आहे या भावनेतून त्यांनी मोठा त्याग केला आणि तीच परंपरा जबाबदारी समजून वैभव नायकवडी तो चालवित आहेत. नागनाथअण्णांच्या स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात 4 कोटी दिले आहेत. दुसर्‍या टप्प्यासाठी 16 कोटींचा निधी  मंजूर करत असल्याची घोषणाही त्यांनी  केली. 

ना. चंद्रकांत पाटील म्हणाले, भात, कापूस, सोयाबीन उत्पाद  शेतकर्‍यांना मदत केली. एफआरपी शेतकर्‍यांना मिळावी म्हणून 2400 कोटी रुपयांचे सरकारने कर्ज दिले. त्याचे 1100 कोटी रुपये व्याज सरकारने भरले. कारखान्यांना जमीन आणि लागणारी सर्व मदत सरकारने केली. ऊस उत्पादकांसाठी जेवढी मदत आमच्या सरकारने केली तेवढी आजपर्यंत कोणीही केलेली नाही.  ते म्हणाले, केवळ साखर निर्मिती करून हुतात्मा कारखान्याने देशात उच्चांकी दराची परंपरा निर्माण केली आहे. वैभव नायकवडी भाजपामध्ये आल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू. 

ना.  देशमुख म्हणाले, नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांसाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष योजना राबविली  तर शेतकर्‍यांना निश्‍चितच लाभ होईल. हुतात्मा उद्योग समुहाने रुग्णालय उभा करावे. मुख्यमंत्री त्याच्या भूमीपूजनाला नक्कीच येतील. 

वैभव नायकवडी प्रास्ताविकात म्हणाले, सरकारने वीज निर्मिती प्रकल्पाला परवानगी द्यावी. स्मारकाच्या दुसर्‍या टप्प्यासाठी आर्थिक तरतूद करावी व सहकारी साखर उद्योग माहिती प्रशिक्षण केंद्रासाठी सादर केलेला प्रस्ताव मान्य करावा. अनेक वर्षांपासून रेंगाळलेला मागासवर्गीय सूतगिरणीचा प्रस्ताव मान्य करावा आणि  उभारणीसाठी मदत करावी. 

ना. सदाभाऊ खोत, डॉ. पतंगराव कदम, मोहनराव कदम, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, पृथ्वीराज देशमुख, कुसुमताई नायकवडी,  राजेंद्रअण्णा देशमुख,  डॉ. दत्ता पाथरीकर, दिनकर पाटील उपस्थित होते.

डॉ. सुषमा नायकवडी, नंदिनी नायकवडी, किरण नायकवडी, गौरव नायकवडी, बाळासाहेब पाटील, नजीर वलांडकर, सावकर कदम, वसंत वाजे, डॉ. सुरेश कदम, निवृत्ती नायकवडी, भगवान पाटील, अरूण कांबळे, सरपंच शुभांगी माळी, संजय अहिर, उमेश घोरपडे, जयवंत अहिर, हुतात्माचे कार्यकारी संचालक दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी आभार मानले.

पतंगरावांचा सल्‍ला घ्यायला हवा होता

हुतात्मा कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या प्रकल्पाला  एकदा मिळालेली परवानगी आधीच्या सरकारने रद्द केली. वास्तविक डॉ. पतंगराव कदम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा तुम्ही सल्‍ला घ्यायला पाहिजे होता. यापुढे हुतात्मा संकुलातर्फे उभ्या राहणार्‍या प्रत्येक प्रकल्पास तातडीने मंजुरी दिली जाईल,असेही त्यांनी जाहीर केले.

अण्णांच्या स्मारकासाठी 16 कोटी मंजूर...

पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या स्मारकाच्या दुसर्‍या टप्प्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 16 कोटी रुपये मंजूर केले. हुतात्माच्या यापुढील सर्व उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांना तातडीने मंजुरी दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.  ना. चंद्रकांत पाटील यांनी वैभव नायकवडी यांना भाजपामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये तुमचे स्वागत करू. आम्ही तुमच्यासोबत राहू आणि नाही आला तरीही आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे राहू, असे आश्‍वासन दिले. इथेनॉल प्रकल्प कर्जमुक्‍त झाल्याचे निवेदकांनी जाहीर केले. त्याचे मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.