Sat, May 30, 2020 11:00होमपेज › Sangli › शासन आदेशाने पदोन्नतीतील साशंकता संपली

शासन आदेशाने पदोन्नतीतील साशंकता संपली

Published On: Dec 31 2017 1:28AM | Last Updated: Dec 30 2017 11:41PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

सर्वोच्च  न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यात यावीत, असा आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. त्यामुळे पदोन्नतीमधील साशंकता संपली आहे. सांगली जिल्हा परिषदेकडील वरिष्ठ मुख्याध्यापक व शिपाई पदोन्नतीतील मार्ग मोकळा झाला आहे. पदोन्नतीची कार्यवाही विनाविलंब होणे गरजेचे आहे. 

उच्च न्यायालयाने दि. 4 ऑगस्ट 2017 रोजी पदोन्नतीमधील आरक्षण अवैध ठरवले आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशास स्थगितीसाठी शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केलेले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती देण्याबाबत अथवा परिस्थिती जैसे थे ठेवण्याबाबत कोणतेही आदेश पारीत केलेले नाहीत. त्यामुळे दि. 27 ऑक्टोबर 2017 पासून राज्यातील सर्व स्तरावरील पदोन्नतीची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली होती. 

दरम्यान सर्वोच्च न्यायालयात शासनाने दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे तुर्तास पदोन्नतीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात सेवाज्येष्ठतेनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अधिन राहून भरण्यात यावीत, असा शासन आदेश जारी झाला आहे. सेवाज्येष्ठता यादीमधील मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांना पदोन्नती देण्यापूर्वी ते दि. 25 मे 2004 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आरक्षणाचा लाभ मिळून सेवाज्येष्ठता यादीत वरच्या स्थानावर आले नाहीत याची खात्री करावी, असेही शासन आदेशात नमूद केलेले आहे. 

सांगली जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षकांची शंभरावर पदे रिक्त आहेत. विस्तार अधिकारी, विषय शिक्षकांची पदेही रिक्त आहेत. सामान्य प्रशासन विभाग, अर्थ विभागाकडील 38 शिपाईंची पदोन्नतीही दोन वर्षे रखडली आहे. या पदोन्नतीचा विषय ऐरणीवर आला असताना पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेला निकाल, 

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, राज्य शासनाने घेतलेली भुमिका यावरून पदोन्नतीची कार्यवाही अडली होती. आता शासन आदेशाने मुख्याध्यापकांच्या खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांवर लवकरच पदोन्नती होईल.  शिपायांच्या 38 पदांपैकी खुल्या प्रवर्गातील सुमारे 30 पदांवर तातडीने पदोन्नती होण्याचे संकेत मिळत आहेत.