Fri, Jul 19, 2019 01:32होमपेज › Sangli › गायरानवर कब्जा : १०० ब्रास दगडाचा पंचनामा

गायरानवर कब्जा : १०० ब्रास दगडाचा पंचनामा

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 06 2018 8:12PMतासगाव : प्रतिनिधी 

गव्हाण (ता. तासगाव) येथील शासकीय गायरानाच्या जमिनीवर दत्ता शिवाजी पवार या बांधकाम ठेकेदाराने कब्जा केला आहे. जवळपास चार ते पाच एकर जागेचा वापर रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी लागणार्‍या दगडी मुरुम व खडीचा साठा करण्यासाठी केला जात आहे. हा प्रकार गेल्या चार ते पाच वर्षापासून सुरू आहे. 

याबाबत दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध करताच शनिवारी मंडल अधिकारी रविकिरण वेदपाठक व तलाठी एस. एस. चव्हाण यांनी या गायरानवरील 100 ब्रास अनधिकृत दगडाचा पंचनामा केला आहे. याबाबत पवार यांना नोटीसही काढण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी :  गव्हाण ग्रामपंचायतीचा भाग असलेल्या विठ्ठलनगर ते तासगाव रस्त्यावर गायरानाची चाळीस ते पन्नास एकर जमीन आहे. ही जमीन माळरान असल्याने नापीक आहे. यापैकी अंदाजे तीन ते चार एकर जमिनीवर एका बांधकाम ठेकेदाराने दगडी मुरुमापासून मोठी खडी तयार करण्याचा उद्योग सुरू केला आहे.

हा प्रकार दै. ‘पुढारी’ ने चव्हाट्यावर आणल्यानंतर शनिवारी मंडल अधिकारी वेदपाठक व तलाठी चव्हाण यांनी गायरानमधील 100 ब्रास दगडाचा पंचनामा केला आहे. याबाबत ठेकेदार पवार यांना नोटीस काढली असून 24 तासाच्या आत खुलासा करण्यास सांगितले आहे. नोटीसीत पवार यांनी दगडाचा साठा करण्यासाठी कोणाचीही परवानगी घेतली नसल्याचे म्हटले आहे. पवार यांचा खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे तहसीलदार सुधाकर भोसले यांनी सांगितले.