Thu, Sep 19, 2019 03:28होमपेज › Sangli › विठ्ठलाईवाडीच्या तीन चिमुकल्यांची शासनाने घेतली दखल

विठ्ठलाईवाडीच्या तीन चिमुकल्यांची शासनाने घेतली दखल

Published On: May 24 2019 3:43PM | Last Updated: May 24 2019 3:44PM

वारणावती : विठ्ठलाईवाडी येथील वरक कुटुंबियांचे समुपदेशन करताना  ॲड. दिलशाद मुजावर शेजारी जिल्हा बालसंरक्षण अधिकारी योगेश नलवडे. ( छाया : आष्पाक आत्तार )पुढारी इफेक्‍ट

वारणावती : आष्पाक आत्तार 
 
 घरी अठराविश्व दारिद्र्य अशातच आईचं आजारपण आणि नुकतचं वडिलांचं झालेलं निधन यामुळे मेटाकुटीला आलेल्या विठ्ठलाईवाडी येथील तीन चिमुकल्यांचा जीवन प्रवास दैनिक पुढारीने उलगडताच समाजातील शेकडो मदतीचे हात त्यांच्यासाठी धावून आले .इतकेच नव्हे तर शासनानेही त्यांची दखल घेऊन लवकरच त्यांचे पुनर्वसन करू असे आश्वासन 'दैनिक पुढारी' ला दिले.

  चांदोली परिसरातील विठ्ठलाई वाडी ( ता. शाहूवाडी )येथील जंगलात वसलेल्या वरक कुटुंबांची जीवनगाथा  दैनिक पुढारीने 'तीन चिमुकल्या जीवांचा केविलवाणा जीवनसंघर्ष' या मथळ्याखाली  प्रकाशित करुन मदतीचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत अनेक सामाजिक संस्था , कार्यकर्ते, उद्योजक यांनी वरक कुटुंबाला भेट देऊन त्यांची विचारपूस केली. रोख रक्कम संसार उपयोगी साहित्य धान्य कपडे अशा स्वरूपात वरक  कुटुंबाला मदत केली . अनेकाणी पालकत्व स्वीकारण्याची संमती दर्शवली. इस्लामपूरच्या आपली माणसं फाऊंडेशनने या मुलांच्या सर्व शिक्षण व आईच्या आजारपणाची जबाबदारी  उचलण्याचे ठरवले. जरिया फाऊंडेशन ट्रस्ट कराड ने या मुलांचा सर्व खर्च करू असे कळवले. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून अनेक सामाजिक कार्यकर्त्यानी फोन करून मदतीचे आश्वासन दिले. अनेकांनी वरक कुटुंबाला प्रत्यक्ष भेटून आर्थिक तसेच संसारोपयोगी साहित्याची मदत केली. 

   शासनानेही पुढाकार घेत काल कोल्हापूरच्या जिल्हा बाल कल्याण  समितीच्या सदस्या  ॲड.  दिलशाद मुजावर तसेच जिल्हा बालसंरक्षण अधिकारी  योगेश नलवडे यांनी संबंधित चिमुकल्यांच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांचे समुपदेशन केले  यावेळी 'दै. पुढारी 'शी बोलताना ॲडव्होकेट मुजावर म्हणाल्या  बालकल्याण समिती ही अशा काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलांसाठी काम करते. शासनाची ती सक्रिय यंत्रणा आहे. अशा मुलांचं संगोपन करणं व त्यांच्या शिक्षणाचा खर्च करणं हे या समितीच्या माध्यमातून होत असतं. सध्या आम्ही या कुटुंबापर्यंत पोहोचलो असून  या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आता  शासन  उचलणार आहे. लवकरच मुले व आईचे योग्य ठिकाणी स्थलांतर करणार आहोत.

दैनिक पुढारीचे अभिनंदन

दैनिक पुढारी मधील वृत्तामुळे आज आम्ही इथे पोहोचलो आहोत. खऱ्या अर्थाने गरज असणारं एक डोंगरी दुर्गम भागात वसलेलं वरक  कुटुंब दैनिक पुढारीने समाजासमोर आणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. ही अभिमानास्पद बाब आहे.
अॅड. दिलशाद मुजावर,  सदस्या बालकल्याण समिती कोल्हापूर