Sun, Jul 21, 2019 05:37होमपेज › Sangli › सरकारी डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस 

सरकारी डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस 

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 8:28PMकडेगाव : रजाअली पिरजादे 

तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रे व दोन ग्रामीण रुग्णालये आहेत. परंतु अपुरे कर्मचारी, सुविधांचा अभाव यामुळे तालुक्यातील बहुसंख्य रुग्ण कराडला उपचारासाठी जाताना दिसतात. अनेक सरकारी डॉक्टर्स खासगी प्रॅक्टिस करतात.

तालुक्यात कडेगाव आणि चिंचणी येथे ग्रामीण रुग्णालये आहेत. मोहिते वडगाव,  खेराडे-वांगी, नेवरी, वांगी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. परंतु या दवाखान्यात डॉक्टर्स नसतात, अशी तेथील लोकांची तक्रार आहे. 

तालुक्यात जवळ जवळ निम्मे डॉक्टर्स आणि कर्मचारी आरोग्य खात्यात कमी आहेत. चार प्राथमिक व  उपकेंद्रात जवळपास दहा डॉक्टर आवश्यक असताना तिथे फक्त चार जण आहेत. दोन्ही ग्रामीण रुग्णालयात आठ डॉक्टर्स आवश्यक असताना त्या ठिकाणी फक्त पाचजण आहेत. तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि दोन ग्रामीण रुग्णालयात जवळपास निम्म्याहून अधिक  कर्मचारी कमी आहेत. अनेक डॉक्टर्स खासगी व्यवसाय करताना दिसतात. महिला डॉक्टर्सबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. शासकीय रुग्णालयातून योग्य प्रकारे सेवा मिळत नसल्याने लोक जवळ असलेल्या कराडकडे धाव घेताना दिसतात. कडेगाव ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यासाठी कर्मचारी नाही. कर्मचार्‍यांसाठी राहण्यासाठी घरे बांधण्यात आली आहेत. परंतु सदर अद्याप ताब्यात दिली नाहीत. त्यामुळे रात्री-अपरात्री रुग्णांची गैरसोय होते. 

कडेगाव नगरपंचायतीने अद्याप आरोग्य सेवा सुरू केली नाही. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नेवरीला नेले आहे. पण अंतर दूर असल्याने लोकांचे  हाल होत आहेत. कडेगावला पूर्ववत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी लोकांची मागणी आहे. आरोग्य खात्यात अनेक कर्मचारी तळ ठोकून बसले आहेत. 

तालुक्यात अनेक बोगस डॉक्टर्स 

तालुक्यात दिवसेंदिवस बोगस डॉक्टरांची संख्या वाढत आहे. विशेष करून अनेक प्रसूती दवाखान्यात तज्ज्ञ डॉक्टर नसतानाही मोठे बोर्ड लावून बाळंतपणाचे दवाखाने सुरू आहेत.आतापर्यंत तालुक्यात केवळ एकाच बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. बोगस डॉक्टर शोध मोहीम पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.