Sat, Jul 20, 2019 23:23होमपेज › Sangli › वंचितांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध

वंचितांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 10:10PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा विकासाच्या सर्व टप्प्यांवर अग्रेसर ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या, वंचितांच्या विकासासाठी राज्य शासन कटिबध्द  असल्याची ग्वाही पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी दिली.

स्वातंत्र्यदिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्री देशमुख यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. खासदार संजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मोहनराव कदम, जिल्हाधिकारी विजयकुमार   काळम - पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, महापालिका आयुक्‍त  रवींद्र खेबुडकर आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा  जिल्ह्यातील  1 लाख, 46 हजार शेतकर्‍यांना 407  कोटी, 39 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला. ई-नाम योजनेतून ऑनलाईन सौदे करून  77  लाख 53 हजार रुपये किंमतीचा 5 हजार 41 क्विंटल बेदाणा विक्री झाली. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून  2 लाख 455 सभासदांच्या खात्यावर 28 कोटी 62 लाख रुपये जमा झाले.  ‘जलयुक्‍त’ची  3 वर्षांत 421 गावांमध्ये 17 हजार 336 कामे पूर्ण झाली आहेत. सन 2018-19 मध्ये जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधून 103 गावे निवडली आहेत.  

देशमुख म्हणाले,   कृषी यांत्रिकीकरणातून जिल्ह्यात मार्चअखेर 1 हजार 789 लाभार्थींना 12 कोटी, 27 लाख रुपये अनुदान वितरीत करण्यात आले. ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या उरलेल्या कामांचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाला आहे.  यासाठी 2 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, कामे वेगाने सुरू आहेत.  टेंभूसाठी   1200 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. 
ते म्हणाले,  मराठा आरक्षणासाठी शासन सकारात्मक असून त्यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. मराठा विद्यार्थ्यांसाठी   8 दिवसांत दोन वसतिगृहे सुरू करण्यात येतील. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेसाठी  जिल्ह्यात 1352 लाभार्थी पात्र ठरले आहेत. यात 28 प्रकरणांना गेल्या 2 महिन्यात कर्ज वितरण केले आहे. 6 राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होत आहे. यावेळी असंसर्गजन्य रोग नियंत्रण व तंबाखूनियंत्रण कार्यक्रम प्रभावी अंमलबजावणीकरिता तंबाखूमुक्‍तीची शपथ  जिल्हा पुनर्वसन अधिकारी अमृत नाटेकर यांनी  दिली.

इंग्लंड येथे राष्ट्रकूल स्पर्धेत तलवारबाजीत चमकदार कामगिरी करून देशाला सुवर्णपदक मिळवून देणार्‍या  गिरीश जकाते या क्रीडापटूचा सत्कार करण्यात आला.  शिष्यवृत्तीत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतील 15 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.   चांदोली  प्रकल्पबाधित लाभार्थींना  प्लॉटवाटप आदेशाचे वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेच्या अँड्रॉईड अ‍ॅपचा शुभारंभ आणि लोकार्पण  करण्यात आले. विजय कडणे यांनी सूत्रसंचलन केले. 

पोलिसांच्या कडक बंदोबस्तात कार्यक्रम

आरक्षणाच्या मागण्यासाठी काही संघटनांनी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम होऊ न देण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर  कार्यक्रमाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  सुरक्षेसाठी तपासणी केल्यानंतरच कार्यक्रमासाठी सोडण्यात येत होते.