Mon, Jul 22, 2019 05:24होमपेज › Sangli › 'शेतकर्‍यांना आता चांगले दिवस येत आहेत'

'शेतकर्‍यांना आता चांगले दिवस येत आहेत'

Published On: Apr 29 2018 7:09PM | Last Updated: Apr 29 2018 7:09PMसांगली : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार शेतकर्‍यांसाठी चांगले निर्णय घेत आहे. पूर्वी आयात करावी लागणारी डाळ आता निर्यात होऊ लागली आहे.  शेतकर्‍यांना आता चांगले दिवस येत आहेत, शेतकर्‍यांच्या आत्महत्या कमी होत आहेत असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केले. 

येथील सहकार भवनमध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव पी. एस. पाटील यांचा निवृत्तीनिमित्त मंत्री अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. खासदार संजय पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार मोहनराव कदम, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे आदी उपस्थित होते. 

मंत्री अहीर म्हणाले, पूर्वी तेलबिया आणि दाळ याची आपणाला आयात करावी लागत होती. त्यासाठी परकीय चलण मोठ्या प्रमाणात खर्च करावे लागत होते. तुरडाळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी शेतकर्‍यांना तूर लागवड करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार तूर उत्पादनात मोठी वाढ झाली. आता तूर डाळ निर्यात होऊ लागली आहे. आपल्या देशातील शेतीमालास मागणी वाढत आहे. तूरीप्रमाणे आता तेल बियाचेही उत्पादन वाढवावे लागेल. तुर डाळीप्रमाणे तेलबियाबाबतीतही ही स्थिती लवकरच तयार होईल. 

ते म्हणाले, महाराष्ट्रात सहकार क्षेत्र सक्षम आहे. ते व्यवस्थीत राहण्यासाठी कायदे करण्यात येत आहेत. साखर उद्योगाला चालणा देण्यासाठी पंतप्रधानांचे प्रयत्न सुरू आहेत. वाढता शेतीमाल ठेवण्यासाठी आणखी शीतगृहांची गरज आहे. सरकार शीतगृह आणि सोलर विद्यूत पंपासाठी प्रयत्न करीत आहे. शेतकर्‍यांनीही अधुनिक युगात बदलले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. यावेळी खासदार संजय पाटील यांचे भाषण झाले. 

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी प्रास्तावीक केले. माजी सभापती सुभाष खोत, जिल्हा परिषद सदस्य विक्रम सावंत, दीपक शिंदे- म्हैसाळकर, चेंबरचे अध्यक्ष शरद शहा, एम. एन. हुल्याळकर आदी उपस्थित होते.