Sat, Jul 20, 2019 15:01होमपेज › Sangli › हॉटेल, रेस्टॉरंटना आले अच्छे दिन

हॉटेल, रेस्टॉरंटना आले अच्छे दिन

Published On: May 22 2018 1:15AM | Last Updated: May 21 2018 8:43PMसांगली : प्रतिनिधी 

गेले काही महिने भाजीपाला, कांदे-बटाटे आणि धान्ये-कडधान्ये यांचे बाजार दर स्थिर आहेत. किंबहुना भाज्यांचे व डाळींचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेने स्वस्तच आहेत. शेतीमाल, कडधान्ये किंवा डाळी यांचे दर कमी झाल्याने शेतकर्‍यांना फटका बसला आहे. मात्र हॉटेल, रेस्टॉरंट यांना मात्र अच्छे दिन आले आहेत.  हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचे दर कमी झाल्याचे दिसत नाहीत. हॉटेल किंवा रेस्टॉरंट यांना आवश्यक सर्व प्रकारच्या कच्च्यामालाचे दर कमी असूनही खाद्यपदार्थांचे दर कमी झालेले नाहीत. तसेच पदार्थांचे प्रमाण (क्वान्टिटी) ही वाढलेली दिसत नाही.

गेल्या वर्षीच्या तुलनेत तांदळाचा अपवाद वगळता गहू, रवा, कडधान्ये, डाळी यांचे दर कमी आहेत. सर्व प्रकारच्या खाद्यतेलाचे दरही स्थिर आहेत. डाळी तर गेल्या वर्षीच्या तुलनेने खूपच स्वस्त आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तूर आणि हरबरा डाळ मुबलक आणि तुलनेने स्वस्त मिळते आहे. शेंगदाणा गेल्या वर्षीच्या तुलनेत स्वस्त आहे. गवार, भेंडी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी, हिरव्या मिरच्या, ढबू मिरची, दोडका, दुधी भोपळा अशा सर्व प्रकारच्या भाज्यांचे दर अगदी ऐन उन्हाळ्यातही तुलनेने स्वस्त आहेत.चहा पावडरचे दर स्थिर आहेत. साखरेची तर किलोला 28 ते 29 रुपयाने विक्री होत आहे. घाऊक साखर घेतल्यास ती आणखी कमी दरात मिळते आहे. दुधाचे दर स्थिर आहेत. रवा-मैदा यांचे दर गव्हापेक्षाही कमी  आहेत. मात्र ब्रेड किंवा अन्य बेकरी पदार्थांचे दर पूर्वी वाढले होते, तेवढेच आजही दिसून येतात. 

चांगल्या प्रतीचा बटाटा तीस रुपये किलो मिळतो आहे. कांदा वीस रुपयांना सव्वा किलो मिळतो आहे. पालेभाज्या आठ-दहा दिवसांत थोड्या वाढल्या आहेत. त्याआधी पालक, मेथी, माठ, चाकवत, कोथींबीर अशा पालेभाज्याही स्वस्तच होत्या.  लालबुंद टोमॅटो दहा रुपये आणि ढबू मिरची दहा ते पंधरा रुपये किलो मिळते आहे. अन्य फळभाज्याही तीस ते पस्तीस रुपये किलो या दराने मिळत आहेत. मात्र हॉटेलमधील डिश पद्धतीच्या भाज्यांचे प्लेटचे दर पूर्वीसारखेच आहेत. तसेच पावभाजी, भजी, मिसळ, बटाटे वडा, उदीडवडा, डोसा अशा पदार्थांचे दर कमी केले गेले नाहीत. खानावळीत राईस प्लेटचे दरही पूर्वीसारखेच आहेत.

दरनियंत्रणाची कोणतीही यंत्रणा नाही

बाजारपेठेतील दर मागणी-पुरवठ्यानुसार ठरतात. कमी किंवा जास्त होतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाची कोणतीही यंत्रणा नाही. असलीच तर ती काही कार्यवाही करते आहे, असे दिसत नाही. हॉटेल, रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या दरावरही किंवा त्यांच्या दर्जावर नियमितपणे  नियंत्रण व देखरेख ठेवणारी कोणताही यंत्रणा नसावी असे सध्याचे चित्र आहे. पुरवठा विभाग, अन्न आणि औषध प्रशासन तसेच ग्राहक चळवळीने तरी  या विषयाकडे लक्ष द्यावे, अशी लोकांची अपेक्षा आहे.