Tue, May 21, 2019 12:12होमपेज › Sangli › सांगलीत गोवा बनावटीची दारू जप्त

सांगलीत गोवा बनावटीची दारू जप्त

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 28 2018 11:20PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील जुना बुधगाव रस्त्यावरील नाक्याजवळ गोवा बनावटीची दारू घेऊन जाणारी मोटार पकडून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 41 हजार 640 रूपयांची गोवा बनावटीची दारू, दोन मोबाईल,19 हजार पन्नास रूपये रोख जप्त करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री पावणेएकच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. 

फिरोज बादशहा मुजावर (वय 22, रा. दत्तनगर), यासीर शब्बीर मुजावर (वय 26, रा. साईनाथनगर, कर्नाळ रस्ता सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सांगलीत गाडीतून गोवा बनवाटीची दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना खबर्‍याकडून मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 

त्यानुसार पथकाने जुना बुधगाव रस्ता परिसरात सापळा लावला होता. रात्री पावणेएकच्या सुमारास इनोव्हामधून (एमएच 10 बीएच 6478) फिरोज आणि यासीर निघाले होते. संशयावरून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ते भरधाव निघून गेले. त्यानंतर त्यांना नाक्याजवळ पाठलाग करून पकडण्यात आले. ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्यांच्या गाडीची झडती घेतल्यानंतर गाडीत गोवा बनावटीची दारू सापडली. याबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी ती विक्रासाठी आणल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून इनोव्हा गाडी, दोन मोबाईल, गोवा बनावटीच्या 750 मिलीच्या 240 बाटल्या, रोकड असा 12 लाख 91 हजार 690 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, सतीश चौधरी, अमित परिट, युवराज पाटील, शशिकांत जाधव, राहुल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.