Mon, Mar 25, 2019 03:27
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › आरपीआयला अनुसूचित जातीच्या सात जागा द्या

आरपीआयला अनुसूचित जातीच्या सात जागा द्या

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 17 2018 8:51PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेच्या निवडणुकीत आरपीआय (आठवले गट) भाजपबरोबर जाण्यास तयार आहे. त्यासाठी एकूण 11 अनुसूचित जातींसाठी आरक्षित  जागांपैकी सात जागा आरपीआयसाठी सोडाव्यात, अशी मागणी प्रदेश सचिव विवेक कांबळे व जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे यांनी केली आहे. त्यासंदर्भात भाजपचे नेते महसूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकार्‍यांशी त्यांची चर्चा झाली आहे. जर आम्हाला जागा दिल्या नाहीत तर वेगळा विचार करू असा पवित्राही घेतला आहे.

केंद्रात व राज्यात भाजप महायुतीत आरपीआय आठवले गट आहे.   महापालिका निवडणुकीतही आरपीआयचा भाजपसोबत जाण्याचा विचार पुढे आला आहे. याबाबत निर्णयासाठी नुकतीच आठवले गटाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपबरोबर आघाडी करण्याचे आदेश आरपीआयच्या पदाधिकार्‍यांना दिले. त्यानुसार विवेक कांबळे व जगन्नाथ ठोकळे यांनी चंद्रकांत पाटील, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्याशी चर्चा केली.   कांबळे म्हणाले, अनुसूचित जातीसाठी आरक्षित जागांमध्येच आमची मोठी ताकद आहे.  आरक्षित 11 प्रभागांपैकी क्रमांक  एक, सात, आठ, दहा, अकरा, चौदा व प्रभाग क्रमांक वीसमधील अनुसूचित जातीच्या जागा ‘आरपीआय’ला सोडाव्यात अशी मागणी केली आहे. याबाबत निर्णय न झाल्यास आम्ही वेगळा विचार करू शकतो. अर्थात काँग्रेसकडूनही आम्हाला ऑफर आहे.