Sat, Jul 20, 2019 08:37होमपेज › Sangli › थकित एफआरपी व्याजासह द्या

थकित एफआरपी व्याजासह द्या

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 12 2018 7:46PMबागणी : प्रतिनिधी

सहकारी साखर कारखान्यांनी सन 2017-2018 या गळीत हंगामातील गाळप उसासाठीची थकित एफआरपीची रक्कम कायद्यातील तरतुदीनुसार व्याजासह देण्याची मागणी वारणा टापूतील ऊसउत्पादक शेतकरी करतो आहे. 

सन 2017-18 च्या गत हंगामात  या भागातून मोठ्या प्रमाणात ऊस गाळपासाठी साखर कारखान्यांनी नेला आहे. मात्र हंगाम सुरू होताना ठरलेल्या तोडग्यानुसार एफआरपीची एकरकमी रक्कम शेतकर्‍यांना काही मिळाली नाही. तसेच एफआरपी अधिक  दोनशे रुपये असे पहिले बिल देण्याचे त्यावेळी साखर सम्राटांनी जाहीर केले होते. मात्र काही ंकारखान्यांनी अद्यापि शेतकर्‍यांना एफआरपीची संपूर्ण रक्कम अदा केलेली नाही. यामुळे ऊसउत्पादकांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. 

अनेक बड्या बड्या कारखानदारांनी या भागातील ऊस उचलला आहे. मात्र अद्यापि शेतकर्‍यांना संपूर्ण एफआरपी मिळालेली नाही. हंगाम प्रारंभावेळी  साखरेच्या दरापेक्षा आता साखर दरात तेजी आहे. प्रतिक्विंटल 3500 रुपयांचा भाव साखरेला मिळत आहे. असे असताना एफआरपी द्यायला कारखानदारांना काय अडचण, असा सवाल होतो आहे. कायद्यानुसार थकित एफआरपीची रक्कम कारखान्यांनी व्याजासह देण्याची मागणी ऊसउत्पादक करतो आहे.

ऊसदर नियंत्रण कायद्यातील तरतूदीनुसार गाळपासाठी उस तोडून नेल्यानंतर साखर कारखान्याने त्या उसाची निश्‍चित केलेली एफआरपी 14 दिवसांच्या आता देणे बंधनकारक आहे. यासाठी विलंब झाल्यास व्याजासह रक्कमदेण्याची तरतूद आहे. याकडे ऊसउत्पादक लक्ष वेधत आहेत.

एकट्या बागणीतच अडीच कोटीची बिले थकित

वारणा काठ हा उसासाठी  हुकमी पट्टा मानला जातो. गावागावात अनेक वैयक्तिक आणि सहकारी उपसा सिंचन योजनांमुळे या भागातील जवळपास बहुतांश सर्वच शेती बागायती झाली आहे. उसाखेरीज अन्य पिके क्वचितच दिसतात. गेल्या हंगामात केवळ एका बागणी गावातूनच तब्बल 45 ते 50 हजार मे. टन ऊस गाळपासाठी गेला असल्याचे सांगण्यात येते. याचा अर्थ या एका गावातच जवळपास अडीच कोटीची थकित एफआरपी येणेबाकी असल्याचे चित्र आहे. याचबरोबरच शिगाव, कोरेगाव, बहादूरवाडी या गावात देखील सरासरी प्रत्येकी 40 ते 45 हजार मे. टन उसाचे उत्पादन होते. याचाच अर्थ या प्रत्येक गावांसाठी प्रत्येकी सव्वादोन ते अडीच कोटीची एफआरपी थकित आहे. यावरुन या भागासाठी ऊसबिलाचे महत्त्व अधोरेखीत होण्यास कोणाची हरकत असणार नाही.