Tue, Apr 23, 2019 22:00होमपेज › Sangli › भेटवस्तू निकालानंतर द्याव्यात : जयंत पाटील

भेटवस्तू निकालानंतर द्याव्यात : जयंत पाटील

Published On: Jul 23 2018 1:11AM | Last Updated: Jul 23 2018 12:14AMमिरज : प्रतिनिधी

मतदाराने भाजपच्या भेटवस्तू नाकारून बंडखोरांना खड्यासारखे बाजूला करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार  जयंत पाटील यांनी  केले.सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक प्रचार शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर कोणकोणाचे अच्छे दिन आले, असा सवाल करुन सतत वाढणार्‍या पेट्रोल दरवाढीचा सामान्य जनतेवर मोठा परिणाम झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

जयंत पाटील म्हणाले, निवडणुकीआधी एका मंत्र्यांनी घरोघरी जाऊन भेटवस्तू वाटा, असे भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले होते. भाजपकडून अशा भेटवस्तू आल्या तर त्या मतदारांनी नाकाराव्यात आणि भाजपला खरोखरच भेटवस्तू द्यायच्या असतील तर त्या निवडणुकीनंतर द्याव्यात, आम्ही त्यांचे स्वागतच करू. निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार यादी जाहीर करण्यास थोडा विलंब झाला. यामुळे खर्‍या अर्थाने भाजपची घालमेल होत होती, अशी टीकाही त्यांनी केली.

महापालिकेतील अनेक सत्ता पदे भोगून तीनही शहरांना सुपरिचीत असलेले नेते भाजपमध्ये गेले आहेत. त्यांच्या बंडखोरीचाही खरपूस समाचार त्यांनी घेतला. या बंडखोरांना मतदारांनी खड्यासारखे बाजूला काढावे. ज्या बंडखोरांनी दुसर्‍या पक्षात जाऊन उमेदवारी घेतली आहे. त्यांनी अजूनही बंडखोरी मागे घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करावा, अन्यथा त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे कायमचे बंद होतील. या बंडखोरांना पुन्हा दारात उभे राहू दिले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यानंतर प्रभाग निहाय मतदारांची समिती स्थापन केली जाईल व या समितीस निवडून आलेले नगरसेवक आपला अहवाल देतील. नागरिकांच्या सूचनेनुसार कामे केली जातील. हा बदल करण्याचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे, असेही आ. पाटील यांनी सांगितले. नागरिक व कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसारच धर्मनिरपेक्ष मतांची फूट होऊ  नये म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत आघाडी केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आ. सतेज पाटील म्हणाले, सांगली, मिरज, कुपवाड शहर वसंतदादांची कर्मभूमी आहे. त्यांच्या स्वप्नातील शहर आपल्याला बनवायचे आहे. गेल्या चार वर्षात महागाईने कळस गाठला आहे, अशी टीका त्यांनी केली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. विश्‍वजित कदम, काँग्रेसचे पक्षनिरीक्षक प्रकाश सातपुते, इलियास नायकवडी यांचीही भाषणे झाली. नायकवडी यांनी ही आघाडी कायम ठेवावी, असे आवाहन केले. 

जनतेच्या रोषामुळे मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा टाळावी लागली

भाजप सरकारला गेल्या काही वर्षांपासून सामान्य जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मराठा, धनगर व अल्पसंख्यांक समाजाला दिलेली आश्‍वासने या सरकारला पाळला आली नाहीत. त्यामुळे सामान्य जनतेचा रोष वाढू लागल्याने महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्र्यांना आषाढी वारीतील विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा टाळण्याची नामुष्की आली आहे, अशी टीका आमदार जयंत पाटील यांनी केली.