Thu, Jun 27, 2019 10:09होमपेज › Sangli › कर्मवीरांच्या जन्मशताब्दीला निधी द्या : आ. सतेज पाटील

कर्मवीरांच्या जन्मशताब्दीला निधी द्या : आ. सतेज पाटील

Published On: Jul 26 2018 1:39AM | Last Updated: Jul 25 2018 10:36PMऐतवडे बुद्रूक : सुनील पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील यांची मातृभूमी असलेल्या वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रूक या गावाच्या विकासासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जन्मशताब्दी (सन 2019) महोत्सवानिमित्त राज्य शासनाने भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार  सतेज पाटील यांनी राज्याच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.ऐतवडे बुद्रूक परिसर हा कर्मवीर भाऊराव पाटील यांची मातृभूमी आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्याच्या वाडी-वस्तीपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविली.  त्यांच्या मातृभूमी असणार्‍या गावामध्ये मात्र विकासात्मक असे भरीव स्वरूपाचे काम आजवर झालेले नाही. हे गाव दुर्लक्षित असल्याचे आ. सतेज पाटील यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे राज्याच्या प्रधान सचिवांकडे लेखी म्हणणे मांडले आहे. 

नागपूर विधानसभा अधिवेशनाच्या निमित्ताने हा औचित्याचा मुद्दा आमदार पाटील यांनी उपस्थित केला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा विषयही पुढे आला आहे. नव्या पिढीला कर्मवीरअण्णांच्या  कार्यकर्तृत्वाची ओळख व्हावी म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन करावे, त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याच्या आठवणींतून नव्या पिढीला प्रेरणा दिली जाऊ शकते. त्यासाठी आ. पाटील यांनी केलेल्या मागणीला अनुसरून राज्य शासनाने ऐतवडे बुद्रूक या गावाच्या विकासाच्यादृष्टीने ठोस निधी देणेही आवश्यक असल्याचे पाटील यांनी या मागणीदरम्यान स्पष्ट केले आहे. कर्मवीरअण्णांच्या येथील शाळेच्या पुतळा परिसरात सांस्कृतिक सभागृहासाठी 5 लाख रुपये निधी देण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी येथेच सन 2003 मध्ये एका कार्यक्रमात केली होती. परंतु प्रत्यक्षात निधी, सभागृह झालेच नाही.  त्यांची घोषणादेखील हवेतच विरून गेली. 

ऐतवडे बुद्रूकचा विकास व जन्मशताब्दीच्या अनुषंगाने निधीच्या उपलब्धतेसाठी उपसरपंच सौरभ पाटील यांनी बहुउद्देशीय स्मारकाच्या निधीसाठी 40 आमदारांना पत्रव्यवहार केला आहे. उर्वरित आमदारांना पत्रव्यवहार करण्याचे काम सुरू आहे. स्थानिक  नेते, ज्येष्ठ कार्यकर्ते यांना घेवून  निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे उपसरपंच पाटील यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले.

चिरंतन स्मृती राहतील...

रयत शिक्षण संस्थेची ऐतवडे बुद्रूक येथे सुमारे 16 एकर जागा असून यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने विद्यालय आहे.  येथील जागेवर प्रशस्त असे सभागृह अथवा या परिसरातील तमाम जनतेला कर्मवीर अण्णांची सतत आठवण राहील, असे चिरंतन  स्मारक उभारले जाऊ शकते. अथवा ग्रामीण परिसरातील युवा वर्गाला कला-कौशल्याचे, रोजगाराभिमुख शिक्षण देणारे एखादे नवे दालनही खुले होऊ शकते. यासाठी पाठपुरावा गरजेचा आहे.