होमपेज › Sangli › पुराचे पाणी दुष्काळी भागास द्या

पुराचे पाणी दुष्काळी भागास द्या

Published On: Jul 31 2018 1:36AM | Last Updated: Jul 30 2018 8:31PMमांजर्डे : विलास साळुंखे

तासगाव तालुक्यातील कायम दुष्काळी भागास वर्षानुवर्षे  दुष्काळाचे भीषण चटके  सहन करावे लागले आहेत. या परिसरातील सर्व लहान मोठे तलाव ओढे - नाले, बंधारे कोरडे पडले आहेत. यावर उपाय म्हणून पावसाळ्यात वाया जाणारे नद्यांचे पाणी या भागात सोडून सर्व तलाव भरून घ्यावेत, अशी मागणी  तालुक्यातील जनतेतून होत आहे.

तासगाव  तालुक्यातील पूर्व भाग हा कायमस्वरूपी दुष्काळी  म्हणून ओळखला जातो. सततचा दुष्काळ, भीषण पाणीटंचाई यामुळे या भागातील शेतकरी व शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या काळात दुष्काळग्रस्तांना मदत करताना शासनानेही दुजाभाव केल्याचा  आरोप जनतेतून होत आहे. अनेकवेळा शेतीबरोबर पिण्यासाठीसुद्धा पाणी उपलब्ध होत नाही.

वर्षानुवर्षे शेतीला पाणी नसल्यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. कर्जफेड, कौटुंबिक जबाबदार्‍या पूर्ण करणे शक्य होत नसल्यामुळे काही शेतकर्‍यांची अवस्था बिकट झाली आहे.  यासाठी या भागास पाणी देणे आवश्यक आहे.  या भागासाठी  आता पाणी सोडले तर नदीकाठावरील गावांना महापुराचा  धोका कमी होऊ शकतो. शिवाय या भागाच्या शेतीला पाणी मिळू शकते. 

 दुष्काळी भागास पाणी देण्यासाठी ताकारी, आरफळ, म्हैसाळ, विसापूर-पुणदी, टेंभू या उपसा सिंचन योजना उभारण्यात आल्या आहेत. आज या नद्यांमधून महापुराचे शेकडो टी. एम. सी. पाणी वाहून अक्षरश: वाया जात आहे.  याच काळात या पाणी योजना मात्र बंद आहेत. यामुळे या योजनांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.  खरेतर ज्या हेतूने  कोट्यवधींचा खर्च करुन  या योजनांची कामे काही प्रमाणात तरी पूर्ण केली तो मूळ हेतूच  आता साध्य होत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. या भागात अनेक ठिकाणी ऐन पावसाळ्यात नागरिकांना पिण्याचे पाणीसुद्धा सहजासहजी मिळत नाही. अनेक गावांत पिण्याच्या  पाण्यासाठी लोकांची रानोमाळ भटकंती सुरू आहे. 

तासगाव तालुक्यात  राजकीय पक्षांनी यापूर्वी विविध कारणांसाठी आंदोलने केली  आहेत. आता  हे राजकीय पक्ष नद्यांचे पाणी दुष्काळी भागास द्यावे, या मागणीसाठी आंदोलन करणार का, याकडे आता लोकांचे लक्ष आहे.