Mon, Jul 15, 2019 23:54होमपेज › Sangli › आरक्षण द्या; अन्यथा धनगर समाज पेटून उठेल

आरक्षण द्या; अन्यथा धनगर समाज पेटून उठेल

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 25 2018 11:19PMनागज : वार्ताहर 

धनगर समाज लवकर एकत्र येत नाही; पण  एकत्र आल्यावर जो वणवा पेटेल. त्याची आग विझविण्याची क्षमता  सरकारकडे नाही. आरक्षणाचा प्रश्‍न निकालात न काढल्यास धनगर समाज  गुज्जर समाजाप्रमाणे पेटून  उठल्याशिवाय राहणार  नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला.धनगर आरक्षणाबाबत आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनात  कवठेमहांकाळ व मिरज तालुक्यातील धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांची  बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येण्यापूर्वी बारामती येथे झालेल्या सभेत भाजपची सत्ता आल्यावर पहिल्याच अधिवेशनात  धनगर समाजाला एस.टी.चे आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले होते. पण ‘टिस’च्या अहवालाचे कारण सांगत गेली चार वर्षे धनगर समाजाला  एस.टी.च्या आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे  समाजात संतापाची लाट उसळली आहे.

ते म्हणाले, एस.टी. प्रवगार्र्त समावेश असलेली ‘धनगड’ही जातच अस्तित्वात नसल्याचे आदिवासी विकास मंत्र्यांनीही अधिवेशनात मान्य केले आहे. त्यामुळे ‘धनगर’व ‘धनगड’ एकच असल्याचे सिद्ध झाले आहे. धनगर समाज हा ब्रिटीशकाळापासून एस.टी. प्रवर्गात आहे. माजी आमदार शेंडगे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सोमवारी राज्यातील धनगर समाजाच्या प्रमुखांची मुंबईत बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला एस.टी. आरक्षणाचे दाखले कधी देणार एवढेच घोषित करावे. बैठकीत आरक्षणाबाबत रास्त तोडगा न निघाल्यास राज्यभर आंदोलन सुरू होईल.

शेंडगे म्हणाले, आरेवाडीच्या बिरोबा मंदिर परिसर विकासासाठी वीस कोटी रूपये  येत्या सहा महिन्यांत देण्यास  शासनास भाग पाडू. मंदिराचा विकास करताना   मंदिरावरील पुजारी व भक्‍तांचा ताबा कायम राहील यासाठी प्रयत्नशील राहू.

सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ म्हणाले, धनगर  समाजाच्या  आरक्षण प्रश्‍नासाठी  पक्षभेद  विसरून समाजबांधवांनी एकत्र यावे. समाजातील कार्यकर्त्यांनी संघटित होऊन तीव्र आंदोलन करून शासनाला आरक्षण देण्यास भाग पाडावे.मराठा समाजाप्रमाणे आंदोलनाची  तीव्रता वाढवल्याशिवाय शासनाला जागा येणार नाही.

या बैठकीला माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष   रावसाहेब कोळेकर, वसंतराव कोळेकर, शिवाजी कोळेकर, पोलिस पाटील रामचंद्र पाटील, ढालगावचे कुमार पाटील, संजय घागरे, सुभाष खांडेकर, पोपटराव शेटे, सुरेश कोळेकर, संजय पाटील, कुंडलिक दुधाळ, बंडू डोंबाळे यांच्यासह कवठेमहांकाळ व मिरज तालुक्यातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.