Mon, Jul 15, 2019 23:39होमपेज › Sangli › दारूबंदी, खर्चाच्या मंजुरीवरून खडाजंगी

दारूबंदी, खर्चाच्या मंजुरीवरून खडाजंगी

Published On: Apr 09 2018 1:40AM | Last Updated: Apr 09 2018 1:33AMइस्लामपूर : वार्ताहर

दारूबंदी प्रस्तावावरील चर्चेवरून  व महिला बालकल्याण समितीने घेतलेल्या कार्यक्रमावरील खर्चास मंजुरी देण्यावरून पालिका सभेत जोरदार खडाजंगी झाली. दारूबंदी प्रस्तावावरील चर्चेचा विषय तहकूब केल्याने आघाडीच्या नगरसेविका सुप्रिया पाटील यांनी सभात्याग केला. जोपर्यंत हा ठराव होत नाही तोपर्यंत सभागृहात येणार नाही, असा निश्‍चय करत त्या सभागृहाबाहेर पडल्या.

नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या उपस्थितीत पालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. विषयपत्रिकेवरील 44 विषयांपैकी 8 विषय तहकूब करण्यात आले. महिला बालकल्याण समिती सदस्यांच्या जेवणावर  प्रत्यक्षात खर्च न झालेल्या 6 हजार रुपये खर्चाच्या मंजुरीवरून शिवसेनेच्या नगरसेविका सीमा पवार व  प्रतिभा शिंदे यांनी प्रशासनाला व महिला बालकल्याण समितीच्या सभापतींना चांगलेच धारेवर धरले.  

न झालेल्या जेवणावर 6 हजार खर्च...

या समितीच्या उपसभापती सीमा पवार यांनी समितीने आयोजित केेलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रणच मिळाले नसल्याचा आरोप केला. शिवाय या समितीने सदस्यांना जेवण न देताच जेवणावर 6 हजार रुपये खर्च दाखविला असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सभापती संगीता कांबळे यांनीही जेवणच दिले नसल्याचे मान्य केले.  यावर मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी या प्रकरणाची चौकशी करू, असे आश्‍वासन सभागृहाला दिले. यावेळी  शकील सय्यद यांनी हा कार्यक्रम पालिकेने आयोजित केला होता की राष्ट्रवादीने?, मग पालिकेने खर्च का द्यायचा, असा सवाल केला.  संजय कोरे यांनी हा खर्च सभापतींनी केला की प्रशासनाने हे आधी स्पष्ट करा. जेवणावरील खर्च रक्कम कुठे गेली? याचा खुलासा करा, अशी मागणी केली. 

दारूबंदीवरून सभात्याग...

आरोग्य समितीच्या शिफारशीनुसार दारूबंदी प्रस्तावावर चर्चा करण्याच्या विषयावर सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. आघाडीच्या नगरसेविका सुप्रिया पाटील, पक्षप्रतोद विक्रम पाटील, आनंदराव पवार यांनी शहरातील महिलांच्या भावना समजून घेवून या विषयावर सभागृहाने आजच चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. तर राष्ट्रवादीचे संजय कोरे, शहाजी पाटील, जयश्री माळी, संंग्राम पाटील, खंडेराव जाधव यांनी  या विषयावर सर्व कायदेशीर बाबी तपासल्या पाहिजेत. त्यामुळे पुढील सभेपर्यंत हा विषय तहकूब ठेवण्याची मागणी केली. यावरून बराच वेळ सभागृहात वादळी चर्चा झाली. शेवटी नगराध्यक्षांनी हा विषय तहकूब केल्याने सुप्रिया पाटील यांनी सभात्याग केला.

पालिकेत डाटा ऑपरेटरांची संख्या वाढविण्याचा ठराव तहकूब करण्यास वैभव पवार यांनी विरोध केला. शहरात गटारी स्वच्छ करण्याचा व झाडलोट करण्याचा वेगवेगळा ठेका दिल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचा आरोप अ‍ॅड. चिमण डांगे यांनी केला. तर शहाजी पाटील यांनी  गटारी तुंबल्याने घाण रस्त्यावर आल्याचे फोटो सभागृहात दाखविले. बाबासो सूर्यवंशी, विश्‍वास डांगे, अमित ओसवाल, प्रदीप लोहार, सतीश महाडिक आदींनी चर्चेत भाग घेतला.