Sat, Feb 16, 2019 10:45होमपेज › Sangli › आरोग्यपंढरी कायम बरबटलेली

आरोग्यपंढरी कायम बरबटलेली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मिरज: जालिंदर हुलवान    

मिरजेत अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे. घंटागाड्या, रिक्षागाड्यांची सोय आहे. पण त्या नियमित येत नव्हत्या.  पण गेल्या महिन्याभरातील महापालिकेतील कारभार बघता या आरोग्यपंढरीतील कचर्‍यातील ग्रहण सुटण्याच्या मार्गावर आहे. शहरातील कचरा उठाव नियमित सुरू आहे. बेडग रस्त्यावरील कचरा डेपोमध्ये खतनिर्मिती सुरू आहे. कचर्‍याचे हे ग्रहण सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन व नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

शहरातील  गुरूवार पेठ, मार्केट परिसर यासह काही ठिकाणी कचर्‍याचे ढीग साठलेले  आहेत. मात्र अनेक ठिकाणी आता कचर्‍याचे ढीग दिसत नाहीत. नगरपालिका असताना मिरजेत घरोघरी जाऊन कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या नव्हत्या. शहरात महापालिकेने घंटागाड्या सुरू केल्या. शहरातील विस्तारित भागांमध्ये ह्या घंटागाड्या सुरू करण्यात आल्या. सध्या तर या घंटागाड्या शहरात नियमित येत आहेत.  सध्या शहरात 33 घंटागाड्या आहेत. या घंटागाड्या विस्तारित भागातही वाढल्या पाहिजेत. आता महापालिकेने 5 रिक्षा गाड्यांची आडल्या आहेत. त्यामध्ये ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा टाकण्याची सोय आहे. भविष्यात या घंटा गाड्याही वाढविण्याचे आदेश आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिले आहेत. 

शहरात सुमारे 70 टन कचरा दररोज तयार होतो. त्यापैकी सुमारे 400 ते 500 किलो हा जैविक कचरा आहे. शहरात असणार्‍या रुग्णालयांमधून हा कचरा जमा होतो. मिरज-बेडग रस्त्यावर कचरा डेपो आहे. तेथे कचरा साठविला जातो. 

सुमारे 50 वर्षांपासून येथे कचरा साठलेला आहे. सध्या तेथे खत निर्मितीचे काम सुरू आहे. खत निर्मिती जलद गतीने केले तर येथील कचरा भविष्यात संपेल आणि महापालिकेलाही त्यातून उत्पन्न मिळेल. याच ठिकाणी जैविक वैद्यकीय कचरा भस्मिकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. ते केंद्र रोटरी क्लबने महापालिकेला दान दिले आहे. 
महापालिकेने त्याचा ठेका दिला होता. त्यानंतर तो इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ताब्यात देण्यात  आला. सध्या त्यामध्ये प्रदूषण महामंडळाने काही त्रुटी काढल्या आहेत. त्या त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या हे भस्मीकरण केंद्र बंद आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून  एका कंपनीला जैविक कचर्‍याची जबाबदारी देण्यात आली आहे. 
सध्या काही ठिकाणी ओला आणि सुका कचरा टाकण्यासाठी डबे ठेवण्यात आले आहेत. ते डबे खूपच लहान आहेत. त्यामुळे एका घरातील जरी कचरा त्यात टाकला तर तो डबा भरतो. त्यामुळे या डब्यांचा उपयोग काय हेच कळत नाही. या डब्यांमध्ये किरकोळ प्रमाणात कचरा टाकण्यासाठी तसे तेथे फलक लावून जागृती करण्याची गरज आहे.


  •