Mon, Apr 22, 2019 12:24होमपेज › Sangli › कचरा डेपो व्यवस्थापनाचे काम संथगतीने

कचरा डेपो व्यवस्थापनाचे काम संथगतीने

Published On: Mar 19 2018 1:48AM | Last Updated: Mar 18 2018 11:35PMकवठेपिरान : संजय खंबाळे 

समडोळी - कवठेपिरान रस्त्यावरील कचरा डेपोच्या व्यवस्थापनाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनधारक आणि ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत. एकीकडे स्वच्छ सर्वेक्षण अभियान, कचर्‍याचे वर्गीकरण आदी कार्यक्रम राबविणार्‍या महापालिकेला  कचरा टाकण्यात येतो त्या डेपोच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे चित्र आहेे. कचरा डेपोच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

जानेवारीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य  भीमराव  माने यांच्या नेतृत्वाखाली या भागातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी कचरा डेपोत येणार्‍या गाड्या अडविण्याचा इशारा दिला  होता. त्यावेळी महापौर हारूण शिकलगार, आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपायुक्त सुनील पवार यांनी भेट देऊन हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले होते. पण आता दोन महिने होत आले तरीही   संरक्षणभिंत उभी झालेली नाही. तसेच डेपोतील कचरा हा आतील बाजूस टाकण्यात आला आहे. त्यामुळे  मनपा विरुद्ध नाराजी निर्माण झाली आहे.   

धुरामुळे वाहनधारक हैराण

या कचरा डेपोमधून आजही आगीचे लोटच्या लोट निघत आहेत.  त्यात डेपोसमोरील मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. तर या आगीचे प्रमाण मोठे असल्याने वाहनधारकांना प्रवास करताना तारेवरची एकच कसरत करावी लागते आहे. त्यामुळे कधीही या ठिकाणी जीवघेणा अपघात होऊ शकतो.