Wed, May 22, 2019 23:00होमपेज › Sangli › पोलिस प्रशिक्षण केंद्रात गांजा सापडला

पोलिस प्रशिक्षण केंद्रात गांजा सापडला

Published On: Mar 09 2018 1:36AM | Last Updated: Mar 08 2018 11:47PMतासगाव : शहर प्रतिनिधी

तुरची (ता. तासगाव) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये बुधवारी  गांजा सापडला. जतीन दत्ता कालकडे (प्रशिक्षणार्थी, रा. मुंबई) या प्रशिक्षणार्थीला प्रशिक्षण केंद्रातीलच स्वच्छता कामगार जीवन श्रीपती कांबळे (रा. सिद्धार्थनगर, पलूस) हा गांजा पुरवत असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती तासगाव पोलिसांनी दिली. 

याप्रकरणी तासगाव पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

राखीव पोलिस निरीक्षक राजाराम गणपती सातवेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षण बॅचमध्ये जतीन हा प्रशिक्षणार्थी आहे. जतीनला काही दिवसांपासून येथील स्वच्छता कामगार कांबळे हा गांजा पुरवत होता असे तपासात आढळले आहे. बुधवारी सकाळी जतीन याच्या बॅगमध्ये सहज तपासणी केली असता सिगारेटचे पाकिट आढळून आले. यानंतर संशय आल्याने जतीनची रुम तपासण्यात आली. यावेळी त्याच्या रुममधील कपड्यांच्या बॅगमध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये 47 ग्रॅम वजनाचा 290 रुपये किंमतीचा गांजा आढळून आला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक उमेश दंडिले करीत आहेत.