Sat, Apr 20, 2019 10:00होमपेज › Sangli › मिरजेत हत्यारांसह टोळी अटकेत

मिरजेत हत्यारांसह टोळी अटकेत

Published On: Jan 11 2018 1:08AM | Last Updated: Jan 10 2018 10:51PM

बुकमार्क करा
मिरज : शहर प्रतिनिधी

येथील दो भाई या लॉजमध्ये वास्तव्यास असलेल्या चौघांच्या टोळीला बुधवारी शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चार कुकर्‍या जप्त करण्यात आल्या. सांगलीतील मनोज गंगधर याची हत्या करण्याचा त्यांचा कट असल्याचे उघड झाले आहे. ही माहिती उपअधीक्षक धीरज पाटील, निरीक्षक सदाशिव शेलार यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

योगेश दिलीप शिंदे (वय 21, रा. हडको कॉलनी, मिरज), प्रथमेश राजेश संकपाळ (19, रा. विजयनगर, सांगली), आकाश दिगंबर सांगोलकर (20, रा. शांतिसागर कॉलनी, सांगली), गणेश परगोंडा हत्तेकर (24, रा. शंभर फुटी रोड, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.     

उपअधीक्षक पाटील म्हणाले, चौघेजण गांधी चौकात असणार्‍या दो भाई या लॉजमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक विजय गोसावी, लक्ष्मण जाधव, चमन शेख, धोत्रे, कांबळे, मासाळ, पाटील यांनी छापा टाकला. त्यावेळी वरील चौघेजण सापडले. त्यांच्याकडून चार कुकर्‍या जप्त करण्यात आल्या. त्यांच्यावर आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. 

योगेश शिंदे हा संशयित गुन्हेगार आहे. त्याला जुलै 2017 मध्ये मिरजेच्या प्रांताधिकार्‍यांनी एक वर्षांसाठी दोन जिल्ह्यांतून हद्दपार केले होते. प्रथमेश हा एम.टेक.चा विद्यार्थी आहे. सांगलीतील मनोज गंगधर याला मारण्यासाठी त्यांनी हत्यारे खरेदी केल्याचे सांगितले आहे. गंगधर याने योगेश शिंदे याच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात नऊ महिन्यांपूर्वी तक्रार अर्ज दिला होता. त्याचा राग योगेशच्या मनात होता. 

कुकरींची खरेदी ऑनलाईन...
संशयितांकडे जप्त करण्यात आलेल्या चारही कुकर्‍या ह्या त्यांनी  अ‍ॅमेझॉन ऑनलाईन शॉपिंग वरून खरेदी केलेल्या आहेत, अशी माहिती तपासात पुढे आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.