Wed, Feb 19, 2020 09:12होमपेज › Sangli › समडोळीत जुगार अड्ड्यावर छापा

समडोळीत जुगार अड्ड्यावर छापा

Published On: Dec 13 2017 1:58AM | Last Updated: Dec 13 2017 12:45AM

बुकमार्क करा


सांगली : प्रतिनिधी

समडोळी (ता. मिरज) येथे शेतातील गोठ्यात सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर मंगळवारी रात्री विशेष पोलिस पथकाने छापा टाकला. यावेळी 9 जुगार्‍यांना अटक करण्यात आली.  8 मोबाईल, 5 मोटारसायकल, जुगाराचे साहित्य आणि  24  हजार 930 रुपये रोख असा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

अजित आप्पासाहेब पाटील (वय 46), सादिक गणी सनदी (वय 47), विनायक काशिनाथ अडसुळे (वय 34), संजय जिनपाल कवठेकर (वय 54), तजमूल युनूस जमादार (वय 36), महाबल जंबू मुंडे (वय 40), सतीश रमेश कांबळे (वय 28), आनंदा शंकर गर्जे (वय 55), रियाज गुलाब सनदी (वय 33, सर्व रा. समडोळी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

समडोळी येथील वॉर्ड क्रमांक दोनमधील सरकारी विहिरीजवळ सरदार गुलाब पटेल यांचा गोठा आहे. या गोठ्यात तीन पानी जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांना मिळाली होती. त्यांनी विशेष पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने मंगळवारी रात्री आठच्या सुमारास समडोळीत छापा टाकला. 

यावेळी सर्व संशयित तीन पानी जुगार खेळताना रंगेहात सापडले. त्यांच्याकडून 24 हजार 930 रुपये रोख, 8 मोबाईल, 5 मोटारसायकल, जुगाराचे साहित्य असा तीन लाखांचा ऐवज जप्त केला. जुगार अड्ड्यावर छापा टाकल्याचे समजल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी अवैध व्यवसायाविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे.