Wed, Jul 17, 2019 16:29होमपेज › Sangli › जिल्ह्यात पुन्हा मटका, जुगार जोमात!

जिल्ह्यात पुन्हा मटका, जुगार जोमात!

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 26 2018 10:27PMसांगली : अभिजित बसुगडे

गेल्या कित्येक महिन्यांपासून चोरून सुरू असलेल्या जुगार आणि मटक्याचे जिल्ह्यात पुन्हा पेव फुटल्याचे चित्र आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांचे विशेष पथक गेल्या चार महिन्यांपासून रोज मटका आणि जुगारावर कारवाई करताना दिसून येत आहे. तरीही असे अवैध व्यवसाय सुरू असल्याचेच चित्र आहे. जुगारातून आलेल्या आयत्या पैशामुळे अनेक सावकार नव्याने उदयास आले आहेत. तर सांगली, मिरजेसारख्या शहरात क्रीडा मंडळांच्या नावाखाली राजरोस जुगार सुरू असल्याचे चित्र आहे. 

पोलिस अधीक्षक शर्मा यांच्या विशेष पथकाने शनिवारी दुपारी आटपाडी तालुक्यातील करगणी येथे पोल्ट्री फार्ममध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या अड्ड्याचा मालक जयसिंगपूर येथील असून त्याच्याकडे क्रीडा मंडळाचा परवाना असल्याचेही सांगण्यात आले. तरीही विशेष पथकाने त्याच्यावर छापा टाकून कारवाई केलीच. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून विशेष पथक जुगार, मटका अड्ड्यावर सातत्याने कारवाई  करत आहे. तरीही हे व्यवसाय अद्यापही पूर्णपणे बंद झाले नसल्याचे चित्र आहे. 

विशेष पथकाने आतापर्यंत सांगली शहरातील विश्रामबाग, बदाम चौक, मिरज तालुक्यातील तानंग, कडेगाव एमआयडीसी, जत शहरासह उमदी, इस्लामपूर आदी ठिकाणी  कारवाई केली आहे. या विशेष पथकाने कारवाई करूनही संबंधित  ठाण्यांच्या हद्दीत अजूनही मटका, जुगार अड्डे सुरू असल्याची चर्चा पोलिस वर्तुळातच आहे. 

मटका आणि जुगारातून आलेल्या आयत्या पैशांवरच अड्डाचालक सावकारीही करत असल्याचे चित्र आहे. यातूनच अडल्या-नडलेल्यांना लुटून या सावकारांनी कोट्यवधींची माया कमवली आहे. पैशांच्या जोरावर  अधिकारी आणि त्यांच्या मर्जीतल्या खास लोकांना हाताशी धरून गरिबांना लुटण्याचा व्यवसाय सुरू आहे. नंतर सिस्टीम आणि विधी विभागाचे कारण देऊन गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केली जाते. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या आदेशाने विशेष पथकाने केवळ जुगार, मटकाच नव्हे तर अवैध दारू, कॅसिनो यावरही कारवाई केली आहे.  स्थानिक पोलिस अवैध व्यवसायांबाबत अनभिज्ञ रहातात कसे, असा प्रश्‍न आहे.  

दबावाला बळी न पडता कारवाई

दरम्यान, अनेकदा कारवाई करताना एलसीबी, गुंडा विरोधी पथक, विशेष पथकावर राजकीय नेत्यांसह अन्य माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो. मात्र पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या खंबीर भूमिकेमुळे  या पथकांनी दबावाला बळी न पडता कारवाई केली आहे. 

‘तासगाव’वरून बोध घ्यावा

तासगाव प्रकरणात प्रचंड दबाव असतानाही पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी कायदेशीररित्याच कडक कारवाई केली. स्थानिक पोलिस अधिकारी, कर्मचारी जर अधीक्षक शर्मा यांच्या पाठीशी राहिले तर सामान्यांच्या मनात असलेला भयमुक्त, अवैध व्यवसायमुक्त, सावकारमुक्त सांगली जिल्हा  दिसू शकेल. त्यामुळे ‘तासगाव’ प्रकरणावरून अन्य अधिकार्‍यांनी बोध घेण्याची आवश्कयता आहे.

क्रीडा मंडळांच्या नावाखाली राजरोस जुगार...

सांगली आणि मिरज शहरात अनेक क्रीडा मंडळे कार्यरत आहेत. धर्मादाय आयुक्तांच्या परवान्याने त्यांना फक्त सभासदांसाठी पैसे न लावता रमी जुगार खेळण्यास परवानगी देण्यात येते. करगणीतही संबंधित मालकाकडे असा परवाना होता. मात्र पैसे लावून तसेच रमी व्यतिरिक्त अन्य जुगार खेळण्यास परवानगी नसल्याने तेथे कारवाई करण्यात आली. सांगली आणि मिरजेतील क्रीडा मंडळांमध्ये परवान्याच्या नावाखाली पैसे लावून जुगार खेळला जातो. पोलिसांच्या छाप्याची चाहूल लागल्यास टोकनद्वारे हा जुगार खेळला जातो. अशा मंडळांनाही अभय दिले जात आहे. अधीक्षक शर्मा यांनी अशा मंडळांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

झारीतील शुक्राचार्यांच्या बंदोबस्ताची गरज...

केवळ मटका, जुगार, सावकारीही नाही वेश्या व्यवसायासह अन्य अवैध व्यवसाय करणार्‍यांचे फार मोठे लाभार्थी दलात आहेत. गुटखा तस्कर, विक्रेते आणि साठेबाज यांचेही चांगलेच लागेबांधे असून पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. एकंदरीतच अधीक्षक शर्मा विशेष पथकाच्या माध्यमातून अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्याचे काम करत असताना काही झारीतील शुक्राचार्य मात्र या व्यावसायिकांचे आधारस्तंभ बनले आहेत. या झारीतील शुक्राचार्यांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. 

लोकप्रतिनिधीचा जुगार, मटक्याला राजाश्रय

जिल्ह्यातील एक विद्यमान लोकप्रतिनिधीचा जुगार आणि मटक्यासह अन्य अवैध व्यवसायांना राजाश्रय मिळत असल्याची चर्चा आहे. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मटका पूर्णपणे बंद केला होता.  पण आता जुगार, मटका आणि सावकारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. युती शासनाच्या काळातच अवैध व्यावसायिक का सक्रीय होतात, असा प्रश्‍न विचारला जात आहे. अवैध व्यवसायाच्या कारणातूनच विद्यमान लोकप्रतिनिधीने एका वरिष्ठ अधिकार्‍याची  एका वर्षात बदली केली होती. याचीची जिल्ह्यात चर्चा आहे. सीमावर्ती भागातही लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादानेच गांजासह अंमली पदार्थांची तस्करी वाढल्याचीही चर्चा आहेच.