Thu, Apr 25, 2019 07:27होमपेज › Sangli › ‘गदिमां’चे माडगुळेत स्मारक व्हावे

‘गदिमां’चे माडगुळेत स्मारक व्हावे

Published On: Mar 05 2018 1:44AM | Last Updated: Mar 04 2018 8:47PMआटपाडी  ः प्रतिनिधी 

आधुनिक वाल्मिकी गदिमा यांची जन्मशताब्दी सन 2019 मध्ये होत आहे. जन्मशताब्दी निमित्त गदिमा यांच्या मूळगावी ‘गदिमां’च्या  साहित्यिक योगदानाला साजेसे स्मारक राज्य सरकारने उभारावे, अशी मागणी मराठी साहित्य परिषदेच्या आटपाडी शाखेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांनी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.  मुख्यमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ही मागणी पूर्णत्वास जाईल, असा  विश्‍वास देशमुख यांनी व्यक्त केला. जन्मशताब्दी व्यापक स्वरुपात साजरी व्हावी याकरीताही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

देशमुख म्हणाले, गदिमांच्या साहित्यसंपदेने मराठी साहित्याचे विश्‍व समृध्द केले. माणदेशी मातीचा गोडवा त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून सातासमुद्रापार पोहोचविला आहे.पुढील वर्षी त्यांचे  जन्मशताब्दी वर्ष आहे. जन्मशताब्दीचे औचित्य साधून चालू अर्थसंकल्पात स्मारकासाठी तरतूद करुन त्यांच्या मूळगावी माडगुळे येथे भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी या मागणीला प्रतिसाद दिला असून गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षीच हे स्मारक पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पदाधिकारी, साहित्यिक क्षेत्रातील दिग्गज आणि लोकसहभागातून मराठी साहित्य विश्‍वातील या थोर सहित्यिकाची जन्मशताब्दी व्यापक प्रमाणात साजरी व्हावी, जन्मशताब्दी निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रम माडगुळे येथे आयोजित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.