Sun, May 26, 2019 20:38होमपेज › Sangli › ‘जीएसटी’ वादात हळदीचे सौदे ठप्प

‘जीएसटी’ वादात हळदीचे सौदे ठप्प

Published On: Mar 08 2018 1:49AM | Last Updated: Mar 07 2018 11:12PMसांगली : प्रतिनिधी

सांगली मार्केट यार्डात बुधवारी सकाळी हळद सौद्यावेळी ‘जीएसटी’ लावून बिल दिले जाईल, असा पवित्रा अडत्यांनी घेतला. त्यामुळे खरेदीदार व्यापार्‍यांनी सौद्यात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला. सुमारे साडेआठ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. बुधवारी सायंकाळी मात्र निजामाबाद हळदीचे सौदे सुरू होते. 

हळदीवरील ‘जीएसटी’ कपातीच्या संभ्रमावस्थेचा परिणाम मार्केट यार्डमधील हळद व्यापारावर होऊ लागला. अडते व खरेदीदार व्यापारी यांच्यात कटुता वाढली आहे. सांगली मार्केट यार्डात नांदेड, वसमत, लातूर प्रमाणे अडत्यांनी खरेदीदार व्यापार्‍यांना विदाऊट जीएसटी बिल द्यावे, अशी मागणी हळद व्यापारी असोसिएशनची आहे. सांगली बाजार समितीनेही अभ्यास समितीच्या शिफारशीनुसार नांदेड, वसमत, लातूर पॅटर्न सांगलीत राबविणे, त्याअनुषंगाने बिलिंगच्या पद्धतीत सुधारणा करणे याबाबत निर्देश दिलेले आहेत. मात्र ‘जीएसटी’ कार्यालयाच्या अधिकार्‍यांकडून लेखी मार्गदर्शन आल्याशिवााय विदाऊट जीएसटी बिल केले जाणार नाही, असा पवित्रा अडत्यांनी घेतला आहे. 

22 हजार पोत्यांचा सौदा ठप्प

बुधवारी सकाळी सौद्याच्या सुरूवातीसच अडत्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. विदाऊट जीएसटी बिल दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केेल. जीएसटीसह बिल स्विकारणार असाल तरच सौदा सुरू करावा, असा पवित्रा अडत्यांनी घेतला. त्यामुळे व्यापार्‍यांनी सौद्यात सहभाग घेतला नाही. परिणामी सुमारे 22 हजार पोती हळदीचा सौदा होऊ शकला नाही. बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, सचिव पी. एस. पाटील  यांनी सौदा ठिकाणी भेट दिली. दुपारी केंद्रीय जीएसटी कार्यालयात बैठकही झाली. बुधवारी सायंकाळी बाजार समितीत जीएसटी अधिकार्‍यांसमवेत बैठक होणार होती. या बैठकीकडे अडते, व्यापार्‍याचे लक्ष लागले आहे. दरम्यान या बैठकीपूर्वी बुधवारी सायंकाळी निजामाबाद हळदीचे सौदे निघाले. क्विंटलला सहा हजार रुपयांपर्यंत दर होता.