Tue, Mar 19, 2019 12:07होमपेज › Sangli › इंधन तस्करी, साठ्यांचे आव्हान कायमच!

इंधन तस्करी, साठ्यांचे आव्हान कायमच!

Published On: Apr 26 2018 2:03AM | Last Updated: Apr 25 2018 8:59PMसांगली : अभिजित बसुगडे

मिरजेतील इंधन डेपोसह परिसरात तस्करी केल्याने एका पोलिसासह तस्करांवर दोन वर्षांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता इंधन तस्करांनी कार्यपध्दतीसह ठिकाणातही बदल केल्याचे चित्र आहे. टँकरना जीपीएस सिस्टीम बसवूनही इंधनाची तस्करी जोमात सुरू आहे. ग्रामीण भागात पाण्याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलची खुलेआम विक्री सुरू आहे. यात मिरजेतील तस्करांचे जुने रॅकेट अद्यापही कार्यरत असून त्यांचा बिमोड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मिरजेत रेल्वे जंक्शनजवळच इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियमचा इंधन डेपो आहे. या डेपोत रेल्वेच्या वॅगनद्वारे रोज कोट्यवधी लिटर इंधनाची आयात होते. या डेपोतून सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना इंधन पुरवठा केला जातो. या डेपोत वॅगनमधून इंधून उतरून टँकरमध्ये भरण्यासाठी ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली आहे. या ठेकेदारांनी यासाठी कामगारांची नेमणूक केली आहे.  अनेक वर्षांपासून या डेपोतून इंधनाची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात होती. 

2015 मध्ये याचा ‘पुढारी’ने पर्दाफाश केल्यानंतर मात्र तस्करांनी तस्करीची पध्दतच बदलली आहे. ‘पुढारी’च्या दणक्यानंतर तस्करांना मदत करणार्‍या पोलिसासह एका तस्कराला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर तस्करी काही प्रमाणात कमी झाली आहे. शिवाय ही तस्करी रोखण्यासाठी कंपन्यांनीच खबरदारीचा उपाय म्हणून इंधन वाहतूक करणारे सर्व टँकर जीपीएसद्वारे जोडले आहेत. मात्र त्यावर आता मिरजेतील तस्करांच्या रॅकेटने नामी शक्कल शोधून काढली आहे. 

कुपवाडमध्ये सापडलेल्या डिझेल साठ्याप्रकरणी अटकेतील संशयितांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. डेपोतून टँकर बाहेर पडल्यानंतर तो कुपवाडमधील अड्ड्यावर आणला जात होता. रस्ता सोडून टँकर आत जाताना काही वेळासाठी जीपीएस सिस्टीम बंद केली जात होती. अगदी काही मिनिटातच चाळीस ते पन्नास लिटर डिझेल, पेट्रोल काढून घेतले जात होते. त्यानंतर पुन्हा टँकर रस्त्यावर आणून जीपीएस सुरू केली जात होते.  केवळ काही मिनिटात हा उद्योग केला जात असल्याने त्यांची चोरी पकडली गेली नव्हती. 

जीपीएस बंद करून अशा प्रकारे शेकडो टँकरमधून पेट्रोल, डिझेल राजरोस काढून घेतले जात आहे.  यातील काही इंधन ग्रामीण भागातील किरकोळ विक्रेत्यांनाही पुरविण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही पाण्याप्रमाणेच पेट्रोल आणि डिझेलचे साठे करून त्याची खुलेआम विक्री केली जात आहे. जिल्ह्यात बहुतांश भागात पेट्रोल पंप असले तरी साठेबाजांकडून कमी किंमतीत पेट्रोल, डिझेल उपलब्ध होत असल्याने विक्री जोमात आहे. कुपवाडमध्ये सापडलेला साठा हा केवळ हिमनगाचे टोक असल्याची चर्चा  आहे.

इंधन तस्करीत कार्यरत असणारे मिरजेतील रॅकेट कार्यरत असून त्यांच्याकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी साठे केले जात असल्याचीही चर्चा आहे. मिरज डेपोत वॅगनमधून इंधन आल्यानंतर त्यामध्ये 0.7  ते 0.8 टक्के बाष्पीभवन गृहित धरले जाते. त्याचाच फायदा घेत तस्करांकडून काही प्रमाणात वॅगनमधील इंधन चोरले जात आहे. पूर्वी मिरजेत रूळाशेजारील वस्तीसह झोपडपट्टीत याचा साठा केला जात असे. अजूनही त्या ठिकाणी इंधन साठा असल्याची चर्चा आहे.  पोलिसांनी तस्करांचे साठे उद्ध्वस्त करण्याची गरज आहे. त्यासाठी पोलिस दलातील झारीतील शुक्राचार्याना बाजूला काढून ठोस कारवाई करण्याची आवश्यकता आहे. 

डेपो हजारवाडीला हलविण्याचा प्रस्ताव धूळ खात

सध्या मिरजेत असणारा इंधन डेपो नागरी वस्तीसह अन्य कारणांमुळे असुरक्षित बनला आहे. शिवाय याठिकाणी वारंवार होणारी तस्करी पाहता कंपनीच्या अधिकार्‍यांनी हा डेपो हजारवाडी (भिलवडी) येथे हलविण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. मात्र त्या प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळाली नाही. हा डेपो हजारवाडीला न हलविल्यास ही तस्करी अशीच सुरू राहण्याची शक्यता आहे. शिवाय पूर्वी या डेपोजवळ घडलेल्या दुर्घटना दडपणार्‍या यंत्रणा डेपो हलू नये यासाठीच प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

टँकर चालकांकडूनच डिझेलचा वापर

पूर्वी तस्करांकडून चोरलेले पेट्रोल, डिझेलची कमी दराने विक्री केली जात होती. मात्र काही कर्तव्यदक्ष पोलिसांनी यावर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर त्यांनी त्यात बदल केला आहे. आता टँकरमालकांकडून पेट्रोल, डिझेलची चोरी केली जाते मात्र ते त्यांच्याच गाड्यांमध्ये वापरले जाते. तर काही तस्कर ग्रामीण भागात अजूनही इंधनाचा पुरवठा करतात. तेथे मात्र कमी किमतीत त्याची विक्री केली जाते. तस्करांची ही साखळी तोडण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. 

Tags : sangli, sangli news, Miraj, Fuel smuggling, Stocks challenge,