Sat, Apr 20, 2019 18:21होमपेज › Sangli › आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार

आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार

Published On: Jul 04 2018 2:19AM | Last Updated: Jul 03 2018 11:43PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होत आहे. यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशाने प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ही प्रक्रिया गतिमान आणि सुरळीत पार पडावी यासाठी सहा ठिकाणी प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी, कक्षासह यंत्रणा काम पाहणार आहे. ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष अर्ज भण्यात येणार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर आजपासून इच्छुकांचे निवडणूक  मैदानातील पहिले पाऊल ठरणार आहे. त्या दृष्टीने इच्छुक आणि पक्षांनीही तयारी केली आहे.सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या 78 नगरसेवकांच्या निवडीसाठी दि. 1 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. यामध्ये चार सदस्यीय 18 आणि तीन सदस्यीय दोन प्रभागांमधून हे सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी आजपासून दि. 11 जुलैपर्यंत अर्जभरणा होणार आहे. यामध्ये प्रत्येक इच्छुकाने महापालिकेच्या विविध कार्यालयाच्या 18 प्रकारच्या ना हरकत दाखल्यांसह कागदपत्रे जोडून अर्ज द्यायचा आहे. ऑनलाईन प्रत्येकी चार अर्ज भरून त्याची प्रत ज्या-त्या निवडणूक कक्षात द्यावयाची आहे. 

दरम्यान, सर्वच पक्षांकडे इच्छुक मोठ्या संख्येने आहेत. सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेने  इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पार पाडली आहे. यानिमित्ताने शक्‍तिप्रदर्शन करीत महापालिकेवर आमचाच झेंडा फडकेल असा दावाही केला आहे. त्यासाठी आता उमेदवारांची यादी निश्‍चित करण्याची प्रकिया सुरू झाली आहे. जिल्हा सुधार समिती-आप, सर्वपक्षीय डाव्या आघाडीनेही इच्छुकांचे अर्ज मागवून मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपला रोखण्यासाठी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अद्याप  जागावाटपात चर्चेचे घोडे अडले आहे. उमेदवारी अर्ज भरताना पक्षाच्या नावाचा उल्लेख आणि एबी फॉर्मही गरजेचा आहे. त्यामुळे आघाडीचा फैसला  झाल्याशिवाय अर्ज दाखल करणे अडचणीचे आहे.   शिवसेना, भाजप, मनसेसह अनेक पक्षांचेही महायुतीसाठी चर्चेचे गुर्‍हाळ सुरू आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही अद्याप उमेदवारी निश्‍चित झालेली नाही.  पक्षांकडून उमेदवारीचा फैसला होईपर्यंत अपक्ष म्हणूनही अनेकजण अर्ज दाखल करू शकतात. 

सुटीचे दिवस वगळून अर्जभरणा

सुट्टीचे दिवस वगळता सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत प्रभागनिहाय कार्यालयात अर्ज दाखल करता येणार आहेत.दि. 11 जुलैरोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे आता इच्छुकांची धावपळ  सुरू होणार आहे. या पंचवार्षिक निवडणुकीत प्रथमच उमेदवारांना ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरावे लागणार आहेत. त्यानंतर हे अर्ज निवडणूक अधिकाार्‍यांकडे जमा करावे लागणार आहेत. त्यानंतर 12 तारखेला अर्ज छाननी होऊन पात्र उमेदवारांची यादी जाहीर होईल.