Wed, Apr 24, 2019 07:32होमपेज › Sangli › राष्ट्रवादीकडून महापालिका आयुक्‍तांच्या यादीची होळी

राष्ट्रवादीकडून महापालिका आयुक्‍तांच्या यादीची होळी

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 8:47PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

आयुक्‍तांनी 188 कोटींची कामे मंजुरीचा दावा बोगस असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी केला. आज या यादीची महापालिकेच्या दारातच होळी करण्यात आली. दुसर्‍या दिवशीही नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी मुख्यालयात शिवाजी महाराज पुतळ्यासमोर ठिय्या सत्याग्रह आंदोलन सुरूच ठेवले. फेकू आयुक्‍तांनी वल्गना करण्यापेक्षा 188 कोटी रुपये कामांच्या वर्कऑर्डर दाखवाव्यात, असे आव्हानही त्यांनी दिले.

नगरसेवकांसह पदाधिकारी रस्त्यावर उतरले. दुसर्‍या दिवशी शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांच्यासह सर्वच नगरसेवक, नगरसेविकांनी महापालिकेत ठिय्या सत्याग्रह सुरू केला.

महापालिकेने दिलेली यादीच बोगस असल्याचा आरोप करीत सर्वांनी महापालिकेच्या दारात या यादीची होळी केली. याबाबत बजाज म्हणाले, राजकीय स्टंटबाजी आम्ही नव्हे आयुक्‍त करीत आहेत. यापूर्वी 16 आयुक्‍त होऊन गेले. त्यांनी कधीच विकासकामांचा खेळ मांडला नाही. जर ते 188 कोटी रुपयांची कामे मंजूर केली म्हणत असतील तर वर्क ऑर्डर किती दिल्या? त्या कामांचे काय झाले? वास्तविक दोन वर्षांत हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक झाले. त्यातील किती कामे झाली? 

कमलाकर पाटील म्हणाले, भाजपची सुपारी घेऊन आयुक्‍त उतरले आहेत. त्यांचे बोलवते धनी आमदार आहेत. जर कामे अडवून शहराचा खेळ मांडत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही जनतेचे नोकर आहात. कामे करायची नसाल तर चालते व्हा.

मोहिते, युवराज गायकवाड म्हणाले, आयुक्‍त हे शासकीय नोकर नव्हे भाजपचे प्रवक्‍तेच बनले आहेत. त्यांनी खुशाल भाजपची तळी उचलावी, पण शहराची विकासकामे करावीत. जनता कोणाला निवडून द्यायचे ते ठरवेल. तुम्हाला ही उठाठेव कशासाठी हवी? दोन दिवस आम्ही बसूनही आयुक्‍त फिरकायला तयार नाहीत.

यावेळी नगरसेविका संगीता हारगे, आशा शिंदे, अंजना कुंडले, प्रियांका बंडगर, प्रार्थना मदभावीकर, माधुरी कलगुटगी, नगरसेवक मनगू सरगर, जुबेर चौधरी, प्रा. पद्माकर जगदाळे, आनंदा देवमाने, सुरेश बंडगर, प्रसाद मदभावीकर, सचिन जगदाळे, मनोज भिसे आदींसह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.