Thu, Jun 27, 2019 16:35होमपेज › Sangli › गुंड भावशाकडून चाकणमध्येही खून

गुंड भावशाकडून चाकणमध्येही खून

Published On: May 13 2018 2:17AM | Last Updated: May 12 2018 11:57PMसांगली : प्रतिनिधी

रेठरेधरण येथील खूनप्रकरणी गेल्या आठ वर्षांपासून फरारी असलेला गुंड भावशा ऊर्फ भाऊसो वसंत पाटील याने  चाकण (जि. पुणे) येथेही एकाचा खून केल्याची कबुली दिली आहे. चाकणमधून आणलेल्या पिस्तुलातूनच त्याने संताजी खंडागळे यांचा खून केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, सुहेल शर्मा यांनी सांगलीचे अधीक्षक म्हणून कार्यभार घेतल्यानंतर भावशाला अटक करण्याची विशेष मोहीम त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीतील गुंडा विरोधी पथक आणि पंढरपूर पोलिसांनी संयुक्तरित्या माहितीचा पाठपुरावा करीत शुक्रवारी भावशाला अटक केली. यामध्ये काम केलेले प्रत्येक अधिकारी, कर्मचारी कौतुकास पात्र आहेत. भावशाच्या शोधाबाबत शर्मा यांच्याकडून सातत्याने आढावा घेत होतो. 

त्याच्या शोधासाठी सांगली पोलिसांचे पथक गोवा, मध्यप्रदेश, गुजरात, पश्‍चिम बंगालसह कर्नाटकात जाऊन आले होते. तांत्रिक मुद्यांच्या आधारे अधीक्षक शर्मा यांनी भावशाच्या शोधाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. यासाठी त्यांनी तंत्रज्ज्ञांसह लष्कराचीही मदत घेतली होती. पंढरपूर पोलिसांशी तसेच चाकणमध्येही चांगला समन्वय साधून गुंडा विरोधी पथकाने भावशाला अटक केल्याचे नांगरे-पाटील  म्हणाले. 

भावशाकडे  मी एक तास चौकशी केल्याचे सांगून ते म्हणाले, त्याने चाकणमध्येही एकाचा खून केल्याची कबुली दिली आहे. मात्र मृतदेह व अन्य बाबींचा सखोल तपास करण्याचे आदेश चाकण पोलिसांना दिले आहेत. तिथे केलेल्या खुनात वापरलेल्या पिस्तुलानेच  खंडागळे यांचा खून केल्याचेही त्याने सांगितले आहे. त्यानुसार त्याने पिस्तुल कोठून आणले याचा तपास सुरू आहे. 

भावशा अतिशय धोकादायक गुंड असून त्याच्या अटकेने अनेक संभाव्य गुन्ह्यांना आळा बसणार आहे. धनाजी पाटील यांच्या खूनप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्यावेळी सुनावणीसाठी आल्यानंतर तो पळून गेला होता. आता त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यादृष्टीने तपास करण्याच्या सूचना दिल्याचेही नांगरे-पाटील यांनी  सांगितले.