Thu, Apr 25, 2019 06:06होमपेज › Sangli › महागड्या, गंभीर आजारांवर मोफत उपचार

महागड्या, गंभीर आजारांवर मोफत उपचार

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 8:54PMसांगली : गणेश कांबळे

खासगी वैद्यकीय सेवा महाग होत आहे. हृदयापासून किडनीपर्यंतच्या शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपये मोजावे लागत आहेत. पैशाअभावी सामान्यांना उपचार मिळू शकत नाहीत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. यासाठी शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेला सांगली जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. हृदयरोग, मेंदूरोग, कर्करोग, किडनी यासह 30 प्रकारच्या 1100 आजारांवर उपचार करण्याची सोय या योजनेत आहे. 

बदलते जीवनमान आणि अन्य कारणामुळे लोकांमध्ये विविध आजार वाढत आहेत. हृदयविकार, मधुमेह, किडनीचे आजार तर वयाच्या तिशीतच सुरू होतात. या आजारांवर तातडीने उपचार करावे लागतात.  परंतु  खासगी रुग्णालयामध्ये यासाठी  लाखो रुपये मोजावे लागतात.  सामान्यांच्या ते आवाक्याबाहेरचे ठरते. उपचाराभावी अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागते.  याचा विचार करुन शासनाने सन 2013 मध्ये राजीव गांधी जनआरोग्य योजना सुरू केली. पुढे 2016 मध्ये या योजनेचे नाव महात्मा फुले जनआरोग्य योजना असे करण्यात आले. त्यात आणखी गंभीर आजारावरील उपचारासाठी मदतीची तरतूद करण्यात आली.  या योजनेतर्गंत 1100 गंभीर आजारावर उपचाराची सोय आहे. मिरज शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय माने म्हणाले, ही योजना सुरू झाल्यापासून सांगली व मिरज  शासकीय रुग्णालयात 5 हजार 800 रुग्णांना लाभ झाला आहे.   दोन्ही रुग्णालयात अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात येतात. 

एका कुटुंबासाठी 690 रु. चा विमा 

राज्यात कोणीही उपचाराविना राहू नये म्हणून शासनाने नॅशनल इन्शुरन्स या विमा कंपनीद्वारे जनतेला विमा सेवा दिली आहे.  पिवळे, केसरी, अंत्योदय, अन्नपूर्णा आदी शिधापत्रिकांधारकांसाठी  ही योजना  आहे. योजना सुरू झाली त्यावेळी प्रत्येक कुटुंबामागे 330 रूपये शासन वार्षिक विमा भरत होते, आता  690 रुपये भरते.

मूत्रपिंड रोपणासाठी अडीच लाख

मिरज ‘सिव्हिल’मधील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय माने म्हणाले, या योजनेत रुग्णांवर शासकीय, खासगी रुग्णालयात उपचार केले जातात. ही योजना कुटुंबासाठी आहे. यात दीड लाखापर्यंतचे उपचार कुटुंबातील व्यक्‍तींवर केले जातात. एकाच कुटुंबातील कितीही व्यक्‍ती  लाभ घेऊ शकतात. नवजात बालकाला देखील या मोफत उपचाराचा लाभ देण्याची तरतूद आहे. मुलाचा जन्माचा दाखला व वडिलांचे रेशनकार्ड दाखविल्यानंतर  ही सेवा मिळू शकते. मूत्रपिंडाचे आजारासाठी, मूत्रपिंडरोपणासाठी अडीच लाखापर्यंतचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. 

अशी असते उपचार प्रक्रिया.!

रुग्ण आणि हॉस्पिटल यांच्यामध्ये दुवा म्हणून कार्य करणारे जिल्हा समन्वयक डॉ. रमेश मगदूम म्हणाले,  जिल्ह्यात शासकीय व खासगी अशा 19  रुग्णालयातून यात  उपचार करण्यात येतात. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी रुग्णांची नोंद घेण्यात येते.  कार्डाची तपासणी करुन  रुग्णांना  हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. तेथे आजाराचे निदान होते. त्यावर  योजनेखाली  उपचार शक्य आहे का? हेही पाहिले जाते. त्यानंतर उपचार करण्यात येतात. 

मदतीसाठी आरोग्यमित्र

रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर दुवा म्हणून आरोग्यमित्र काम करतात. हॉस्पिटलकडून रुग्णांना सुविधा दिल्या जातात की नाही, याची माहिती आरोग्यमित्र दररोज घेतात.  रुग्णांना उपचार, मोफत औषधे, जेवण आदींची नोंद केली जाते. रुग्ण उपचार घेऊन घरी गेल्यानंतरही आरोग्यमित्राकडून विचारपूस होते.  रुग्णालयातून घरी पाठविल्यानंतरही औषधोपचार केले जातात.  रुग्णांकडून हॉस्पिटलमध्ये रक्कम घेतली जाते का? यावर लक्ष ठेवले जाते.  रुग्णाला रुग्णालय सोडताना प्रवास भत्ता दिला जातो. सांगली, मिरज, आष्टा, इस्लामपूर व जत येथे 19 हॉस्पिटलमधून 36 आरोग्यमित्र आहेत.

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे, पत्रकारांना योजनेचा लाभ

या योजनेचा लाभ अमरावती, औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा हे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत. या 14 जिल्ह्यातील शेतकरी कुटुंब सदस्यांना याचा लाभ मिळतो.  यासाठी पांढरी शिधापत्रिका, सातबारा आवश्यक ठरतो. अधिस्वीकृतीपत्रिकाधारक पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना याचा लाभ मिळतो. अनुदानित आश्रमशाळा,  अनाथश्रमातील मुले, महिला आश्रमातील महिला, वृद्धाश्रमातील  नागरिक यांनाही लाभ मिळू शकतो. 

राज्यभरात कोठेही लाभ..! 

डॉ. माने म्हणाले, या योजनेतर्गंत  शासनाने मंजुरी दिलेल्या राज्यातील कोणत्याही  रुग्णालयात रुग्णाला उपचार घेता येतात. दुसर्‍या जिल्ह्यात जर रुग्ण उपचारासाठी गेला तर त्याच्यावर तातडीने उपचार करण्याची जबाबदारी रुग्णालयाची आहे.  आरोग्यमित्रामार्फत संबंधित रुग्ण योजनेत बसतो की नाही, यासंबंधी याची खात्री केली जाते. उपचार सुरू झाल्यानंतर रेशनकार्ड आणि ओळखपत्र 72 तासाच्या आत जमा केले तरी चालते. पण ओळखपत्रासाठी उपचार थांबविले जात नाहीत. 

Tags : sangli,Free treatment, expensive, critical illnesses,