Tue, Jul 16, 2019 00:04होमपेज › Sangli › बचतगटास कर्जाच्या आमिषाने फसवणूक 

बचतगटास कर्जाच्या आमिषाने फसवणूक 

Published On: May 13 2018 2:17AM | Last Updated: May 12 2018 11:52PMविटा  ः  वार्ताहर 

बचत गटाला शासनाचे 50 हजार रुपयांचे कर्ज देतो, असे सांगून बनावट फॉर्म भरून घेऊन महिलांची  फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. गणेश गोरे (रा. केशवनगर जि. बुलढाणा) आणि पद्माकर तामसकर (रा. मेहकर जि. बुलढाणा) अशी दोघांची नावे आहेत. ही घटना शनिवारी उघडकीस आली. याबाबत विटा पोलिसांत बाबासाहेब मारुती कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश गोरेला अटक केली आहे.

बाबासाहेब कांबळे हे दि.18 मार्च रोजी कामानिमित्त कराडला गेले होते. कराडहून विट्याकडे येत असताना एस.टी.त त्यांना बचत गट प्रतिनिधी नेमणे आहे, अशी जाहिरात दिसली. त्या जाहिरातीतील नंबरवर फोन केला त्यावेळी गोरे याने तो महाराष्ट्र लघुउद्योग मंडळ विभाग 3 चा बचतगट फेरतपासनीस असल्याचे सांगितले. तसेच शासनाची स्कीम असून त्यात तुम्ही 10 बचतगट तयार करा. बचत गटातील महिलांकडून 1 हजार रुपये घ्या त्यांना शासन 50 हजार रुपये कर्ज देईल. या कर्जावर 50 टक्के  सबसिडी मिळेल असे सांगितले. 

त्यानंतर कांबळे यांनी विट्यात एक बचत गट तयार करुन प्रत्येक महिलेकडून 1 हजार  असे 20 हजार रुपये गोळा केले. मीना बबन कांबळे, संजीवनी बाबासो कांबळे, निलम हणमंत कांबळे, वंदना अशोक वायदंडे, मीना गजानन कांबळे, शोभा सुनील कांबळे, लक्ष्मी भास्कर कांबळे, रेश्मा अमोल कांबळे, जानकी उद्धव कांबळे या महिलांचा बचत गट केला.

 त्यानंतर गोरे विट्यात आला. महिलांचे फॉर्म भरुन घेऊन पैसे घेऊन गेला. जाताना पंधरा दिवसांनी तुम्हाला बचतगट रजिस्ट्रर होऊन पैसे भरल्याची पावती मिळेल असे सांगितले.  तसेच ‘हे फॉर्म मी माझे साहेब पद्माकर तामसकर यांच्याकडे देणार आहे’ असे  सांगितले. 

पंधरा दिवसानंतर कांबळे यांनी गोरे याला फोन केला; परंतु तो रजिस्ट्रेशनबद्दल उडवाउडवीची उत्तरे देली लागला. त्यानंतर दि.27 एप्रिल रोजी  कांबळे यांनी मुंबई येथील उद्योग मंडळाच्या कार्यालयात जाऊन माहिती घेतली. त्यावेळी शासनाची अशी कोणतीच योजना नसल्याचे समजले. 

गणेश गोरे व  पद्माकर तामसकर या दोघांनी सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात महिलांना बचतगटाचे कर्ज देतो असे सांगून  फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. फसवणूक झालेल्या महिलांनी न घाबरता तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक रविंद्र पिसाळ यांनी केले आहे. 

पोलिसांच्या जाळ्यात सापडला

कांबळे हे गोरेला गेल्या महिन्यापासून फोन करुन बचतगटांचे रजिस्ट्रेशन देण्याबाबत विनंती करीत होते. परंतु तो दाद देत नव्हता. कांबळे यांनी विटा पोलिसांशी संपर्क साधला. त्याचवेळी गोरे याला ‘आणखी बचत गट देतो तुम्ही विट्याला या’ अशी बतावणी केली. आणखी पैसे मिळतील या आशेने  गोरे शनिवारी विट्यात आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.