सांगली : प्रतिनिधी
शहरातील स्टेशन चौकात एकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने चौघांना अटक केली. त्यामधील तिघेजण इचलकरंजीतील आहेत. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी जानेवारीत हुपरी येथे टाकलेल्या दरोड्याची कबुली दिली आहे. चौघांनाही सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शहाजी शामराव पाटील (वय 50, रा. सांगलीवाडी), अक्षय अर्जुन भोसले (वय 24, रा. जवाहरनगर, इचलकरंजी), मनिष भरत सांगावकर (वय 25), सुखदेव ऊर्फ छोट्या चांगदेव ढावारे (दोघेही रा. इचलकरंजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास स्टेशन चौक परिसरात सांगलीवाडीतील राजाराम शंकर जाधव यांना चौघांनी बेदम मारहाण केली होती. पैशाच्या देवाण-घेवाणीवरून ही घटना घडली होती. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.
यातील संशयितांबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला माहिती मिळाली होती. चौघेही संशयित नळभागात आल्यानंतर त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी जाधव यांना मारहाण केल्याची कबुली दिली. त्यानंतर चौघांकडेही वेगवेगळी चौकशी केल्यानंतर इचलकरंजीतील तीनही संशयितांनी जानेवारीत हुपरी (ता. हातकणंगले) येथे टाकलेल्या दरोड्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात ते फरारी होते. याबाबत हुपरी पोलिसांना कळविण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक राजन माने यांनी सांगितले.
निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंतम खाडे, अशोक डगळे, अझर पिरजादे, सचीन कनप, चेतन महाजन, राजू मुळे, निलेश कदम, सूर्यकांत सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.