Thu, Mar 21, 2019 11:15होमपेज › Sangli › दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद

दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 11:29PMकवठेमहांकाळ :  प्रतिनिधी

कोंगनोळी-पांडेगाव रोडवरील रेल्वे गेटजवळ दरोड्याच्या तयारीत असणार्‍या पाच जणांच्या आंतरराज्य टोळीतील चौघांना कवठेमहांकाळ पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे, सत्तूर, कटर, कटावणी जप्त केले. 

कवठेमहांकाळ, जत, अथणी तालुक्यातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, चार जणांना 14 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या सलगरे दूरक्षेत्राचे हवालदार विजय घोलप, पोलिस नाईक विजय अकुल यांना कोंगनोळी - पांडेगाव रोडवरील रेल्वे गेटनजिक शेतात दोन मोटारसायकल व पाच संशयित तरूण असून त्यांच्याजवळ शस्त्र व दरोड्याचे साहित्य असल्याची माहिती मिळाली. 

रेल्वे फाटकाजवळ पोलिसांनी छापा टाकून विजयकुमार ऊर्फ अक्षय शंकर पाटील ( वय 22,रा.डफळापूर,ता. जत), सतिश शिवाजी कोळी ( वय 27 रा.घाटनांद्रे), मुकुंद ऊर्फ सोनू श्रीकांत दुधाळ े(वय 26, रा. कोंगनोळी) व  राजकुमार पांडुरंग पाटोळे (वय 22, रा. नांगोळे सर्व ता. कवठेमहांकाळ) यांना अटक केली.  दीपक दशरथ पाटील (रा. संबर्गी ता. अथणी) हा मोटर सायकल घेऊन फरारी झाला.  या चौघांकडे नऊ एम.एम.चे एक पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, सत्तूर, कटावणी, चटणी पूड, हेक्साब्लेड, कटर असे दरोड्याचे साहित्य मिळाले. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.