Sun, Jul 21, 2019 07:56होमपेज › Sangli › ‘ओटीएस’साठी चार दिवसांची ‘डेडलाईन’ 

‘ओटीएस’साठी चार दिवसांची ‘डेडलाईन’ 

Published On: Jun 27 2018 1:22AM | Last Updated: Jun 27 2018 12:18AMसांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत ‘ओटीएस’चा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकर्‍यांना 30 जून 2018 ही  ‘डेडलाईन’ आहे. पात्र शेतकर्‍यांनी या मुदतीत थकित कर्जाची दीड लाखावरील रक्कम भरून दीड लाख रुपये कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी केले आहे. पाटील म्हणाले, ‘ओटीएस’साठी पात्र शेतकर्‍यांनी कर्जाची दीड लाखावरील रक्कम भरल्यास दीड लाखाचे कर्ज माफ होणार आहे. शिवाय त्यांना खरीप हंगाम 2018 साठी नव्याने अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा तातडीने केला जाईल. त्यामुळे ‘ओटीएस’साठी पात्र शेतकर्‍यांनी दि. 30 जून 2018 च्या आत थकीत कर्जाची दीड लाखावरील रक्कम भरून दीड लाख रुपये कर्जमाफीचा लाभ घ्यावा.  

पाटील म्हणाले, जे शेतकरी 3 लाखांपर्यंतचे पीक कर्ज घेऊन त्याची वेळेत परतफेड करतील त्यांना केंद्र शासनाकडून 3 टक्के आणि राज्य शासनाकडून 1 लाखांपर्यंत 3 टक्के व 1 लाखावर ते 3 लाखांपर्यंत 1 टक्के याप्रमाणे व्याज परतावा मिळतो. त्यामुळे शेतकर्‍यांना 1 लाखापर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्केने, तर 1 लाखावर ते 3 लाखापर्यंतचे पीक कर्ज 2 टक्के व्याज दराने उपलब्ध होते. आता सांगली जिल्हा बँकेनेे 1 लाखावर ते 3 लाखापर्यंतच्या कर्जावर भराव्या लागणार्‍या 2 टक्के व्याजाचा परतावा देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा बँकेला झालेल्या नफ्यातील सुमारे 14 कोटी रुपयांची तरतूद त्यासाठी केलेली आहे. शेतकरी हिताचा हा महत्वपूर्ण निर्णय आहे. जिल्हा बँक स्वनिधीतून 2 टक्के व्याजाची रक्कम देणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आता 3 लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने होणार आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी सन 2017-18 च्या हंगामातील कर्जाची फेड दि.30 जून 2018 अखेर करावी.